राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने दौंड मध्ये कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

अख्तर काझी
दौंड : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने येथील अखिल भारतीय मराठा महासंघ व शिवाई देवी मंदिर ट्रस्ट, शिवराज नगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सोहळ्यामध्ये कष्टाच्या वातावरणात मुलांना घडविणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. डॉ.संगीता जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यास पो. निरीक्षक भाऊसाहेब पाटील ,राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक राजलक्ष्मी शिवणकर ,नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष टेंगले, रोटरीच्या मा.अध्यक्षा शालिनी पवार, दौंड मेडिकल असोसिएशनच्या मा.अध्यक्षा डॉ. सुरेखा भोसले, सामाजिक कार्यकर्त्या स्वाती सावंत, रूपाली पवार, योगिनी दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात आपले विचार मांडताना डॉ. संगीता जगदाळे म्हणाल्या की, आदिल शहाच्या दरबारात शहाजीराजे सरदार म्हणून होते, त्यांना त्यांच्यासाठी लढावे लागत होते. तशा माँ जिजाऊ सुद्धा सरदार होत्या, पण त्यांना समजत होते की आपली कुचंबना होत आहे. जनतेवर मोठा कर त्यावेळी लादला गेला होता, जनतेची उपासमार होत होती. देशमुख, पाटील ,देशपांडे हे सगळे जहागीर जनतेला लुटत होते आणि अशा काळात या जिजाऊ साहेब यांनी शिवबा घडविला. आज आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो आहे की ज्या जिजाऊंनी शिवबा घडविला आणि ज्या शिवबांनी महाराष्ट्र नव्हे भारत घडविला त्या जिजाऊंची आठवण काढून आपण आनंदोत्सव साजरा करतो आहे. आपण आपल्या आईला आज मोठा सन्मान देतोय. त्या जिजाऊंना मनापासून अभिवादन. आम्ही त्या जिजाऊंच्या लेकीच आहोत.

आज तुम्ही सगळ्या जणी कष्टातून वर येऊन तुमच्या मुलांसाठी जगता आहात म्हणूनच तुमचा हा सत्कार मराठा महासंघातर्फे होतो आहे. आणि त्या निमित्ताने आज आम्ही जिजाऊंची आठवण काढत आहोत. जिजाऊंनी कधी स्वार्थ नाही पाहिला, त्यांनी रयतेचा विचार केला. आमची भारतीय संस्कृती, स्वामीजी म्हणतात आमचा धर्म जर कोणी टिकविला आहे तर तो स्त्रियांनी आणि त्यागी, संन्यासांनी. आमची भारतीय संस्कृती की जिथे स्त्रिया व्रत, वैकल्य, पूजा पाठ ,उपवास करतात. पुरुष कितीही बाहेर असला तरी घराची जी परंपरा आहे ती स्त्री पासून चालली जाते. स्त्रिया संपूर्ण घराचा विचार करतात, मुलांना त्या कष्टाच्या वातावरणात घडवतच असतात आणि अशाच जिजाऊ मधून एखादा थोर शिवबा जन्माला येतो. या जिजाऊंनी आम्हाला, महाराष्ट्राला अस्मिता दिली. एका स्त्रीमुळे हा महाराष्ट्र घडला. महिला जेव्हा सांघिकपणे एकत्र येतात तेव्हा त्या इतिहास घडवितात. आम्ही कुठेच कमी नाही, आम्ही सावित्रीच्या, अहिल्याच्या, जिजाऊंच्या आणि इंदिरा गांधींच्या लेकी आहोत. आम्ही आम्हाला कधीच दुर्बल समजणार नाही.

स्वामी विवेकानंद यांच्या विषयी बोलताना संगीता जगदाळे म्हणाल्या की, आज भारतामध्ये अनेक धर्मांना ,जातींना घेऊन जो देश पुढे चालला आहे, अंतर्गत कलह माजला आहे, अनागोंदी सुरू आहे. आम्ही रामाचे नाव घेतो आणि सांगतो की आम्ही रामाचे वारसदार आहोत. जो राम वडिलांचे आणि आईचे शब्द ऐकून वनात गेले होते, जो भरत मी राज्याभिषेक करणार नाही, मी रामांना बोलावून आणतो असा म्हणत होता त्यांचे वारसदार खुर्चीवरून भांडत आहेत. आम्ही एकमेकांचा गळा घोटतो आणि आम्ही सांगतो आम्ही रामाचे वारसदार आहोत. यावेळी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, मुख्याधिकारी संतोष टेंगले, शालिनी पवार यांनीही आपल्या भाषणातून मोलाचे मार्गदर्शन केले.

अंजना झुरंगे, वैशाली जगताप, मार्था अँथनी, लता मार्कड, राजश्री सांगळे, सुनीता घाडगे, सत्यभामा देवकर, प्रतिभा रेवाळे, रोहिणी घारे ,नंदा दोरगे या कर्तुत्वान महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रा.अरुणा मोरे यांनी प्रास्ताविक केले तर सुषमा दरेकर यांनी आभार मानले.