वसुली पत्रकारितेने सर्वसामान्य व्यवसायिक हैराण, चिरीमिरीसाठी तालुक्यातही ब्लॅकमेलींग वाढले ! कुणी अश्या पद्धतीने धमकावत असेल तर थेट गुन्हे दाखल करणार

अब्बास शेख

दौंड : ना जर्नालिजम (पत्रकारिता विद्या), ना कोणत्या मोठ्या वृत्तपत्राचा दांडगा अनुभव, ना लिखानाचे कोणतेही कसब मात्र तरीही गळ्यात प्रेस आयकार्ड गुतवून सर्वसामान्य व्यवसायिकांना धमकावून पत्रकारिता आणि बातम्यांच्या नावावर वसूली करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे.

असे केले जात आहे ब्लॅकमेल काही सर्वसामान्य पिडीत व्यवसायिकांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, काहीजण व्यवसायिकांना हेरतात, नंतर त्यांना टार्गेट करताना त्यांच्या व्यवसायातील त्रुटी काढल्या जातात. मग काय योग्य काय अयोग्य हे त्यांना दाखवून किंवा डमी ग्राहक पाठवून अधिकृत व्यवसायच कसा अनधिकृत व्यवसाय आहे याची भीती दाखवून त्यांना ब्लॅकमेल केले जाते. मध्यस्थाच्या मार्फत त्यांना भेटणे किंवा मेसेज, फोन केले जातात आणि मोठ्या रकमेची मागणी केली जाते. सर्वसामान्य व्यवसायिक जुमानत नाही असे दिसले की त्याच्या विरोधात मग टार्गेटिंग बातम्यांचे सत्र सुरु केले जाऊन त्यास बदनाम करण्याचे सत्र सुरु होते असे अनेक पिडीत व्यवसायिक सांगत आहेत.

भीतीने व्यवसायिक तयार मात्र व्हिडीओ रेकॉर्डिंगमध्ये काळे कारनामे रेकॉर्ड सध्या बातमीदारीच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगचे पेव फुटले आहे. काही ठिकाणी हे लोक जाऊन मोठ्या रकमेची मागणी करताना व्हिडीओ रेकॉर्डिंगमध्ये कैद झाले आहेत. त्यामुळे पिडीत व्यवसायिक ही रेकॉर्डिंग वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन येत्या काळात या बहाद्दरांवर खंडणीचे गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे हे व्यवसायिक बोलताना दिसत आहेत. त्यामुळे आता या ब्लॅकमेलिंग पत्रकारितेचा फुगा कधी फुटतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

जाहिरात मागणे आणि खंडणी मागणे यात हा आहे फरक अनेकवेळा खरी पत्रकारिता करणाऱ्यांना खंडणीसारख्या खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्यात आल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. मात्र अश्या प्रकारणांमध्ये खऱ्या पत्रकारांना न्यायहि मिळाला आहे. अधिकृत वृत्तपत्रे आणि अधिकृत न्यूज चॅनेल यांचा मुख्य सोर्स हा जाहिरात आहे. जाहिरातींशिवाय वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनेल चालणे अवघड आहे त्यामुळे व्यवसायिकांना विनंतीपूर्वक त्यांच्या व्यवसायाची किंवा शुभेच्छा जाहिरात मागणे हे गैर नाही मात्र जाहिरात न मागता थेट त्यांना पैसे मागणे, हफ्ता सुरु करण्यास लावणे हे सर्व गैर असून हे सर्व प्रकार खंडणीच्या श्रेनीत येतात त्यामुळे ही पत्रकारिता ब्लॅकमेलिंग पत्रकारिता म्हणून ओळखली जाते आणि पत्रकारितेच्या आड अशी कृत्ये करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होने ही काळाची गरज आहे.

पत्रकारिता ही सामाजतील सर्व बाबींवर लिखाण करणारी असावी पत्रकारिता म्हणजे राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य, गुन्हेगारी जगत, कृषी विषयक या विविध विषयांवर बातमीदारी करणारी असावी मात्र अनेक ठिकाणी खऱ्या पत्रकारितेचा मुख्य उद्देश बाजूला सारून फक्त सर्वसामान्य व्यवसायिकाच्या त्रुटी, गुटखा, मटका, वाळू यावरच लक्ष केंद्रित पत्रकारिता केली जात असल्याचे दिसून येत आहे. अनधिकृत धंदे हे बंद व्हायलाच पाहिजेत मात्र ते बंद होण्याची तितकीच स्वच्छ मानसिकताही पत्रकारितेची असली पाहिजे अन्यथा पॅकेज सुरु करा, महिन्याला हफ्ता चालू करा किंवा इतके इतके पैसे द्या, अश्या मागण्या ह्या पत्रकारितेच्या उद्देशाला काळिमा फासणाऱ्या ठरणाऱ्या आहेत.

ब्लॅकमेलिंग पत्रकारितेविरोधात मुख्य प्रवाहातील पत्रकार आक्रमक ब्लॅकमेलिंग आणि खंडणीखोर पत्रकारितेविरोधात आता मुख्य प्रवाहातील पत्रकार आणि संघटनाही आक्रमक पवित्रा घेऊ लागल्या आहेत. बोगस आणि ब्लॅकमेलिंग पत्रकारितेला आळा घालण्यासाठी आता मुख्य प्रवाहातील पत्रकारांनी कंबर कसली असून लोकांना ब्लॅकमेल करणाऱ्या बोगस पत्रकारांवर थेट गुन्हे दाखल करावेत असे आवाहन मुख्य प्रवाहातील अधिकृत पत्रकार करत आहेत. तसेच याबाबतचे अधिकृत विनंती अर्जही पुणे पोलीस अधीक्षक आणि पोलीस कमिशनर यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

खरीच पैशांची मागणी अथवा धमकी दिली जात असेल तर तक्रार द्या, हयगय केली जाणार नाही थेट गुन्हा दाखल करू – पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे पत्रकारिता करत असताना, लिखाण करताना अनेक चांगले वाईट अनुभव येतात. यामध्ये एखाद्याच्या विरोधात लिखाण केले तर तो त्या पत्रकाराला मुद्दाम खोट्या केस किंवा आरोपात गुंतविण्याचे प्रयत्न करतो मात्र हे प्रयत्न पुढे टिकत नाहीत, मात्र काहीजण मुद्दाम व्यवसायिकांना धमकावणे, पैशांची मागणी करणे, हफ्ते घेणे असले प्रकार करतात हे पूर्णपणे चुकीचे आहे. याबाबत यवतचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी खरोखरीच पिडीत असलेल्यांना आवाहन केले आहे. आणि जर कोणी मुद्दाम, जाणूनबुजून तुम्हाला त्रास देत असेल, धमकावत असेल किंवा पैशांची मागणी करत असेल तर अश्या व्यवसायिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. अश्या लोकांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.