अख्तर काझी
दौंड : केंद्र व राज्यशासन सातत्याने लोकांना विविध सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. सार्वजनिक व वैयक्तिक योजनांच्या सुविधांचा यामध्ये समावेश आहे. त्याची अंमलबजावणी सुद्धा व्यवस्थितपणे होत आहे, केंद्र व राज्य सरकारच्या योजना समजून घेण्यासाठी कसरत करावी लागू नये यासाठी या कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठीचा हा संकल्प आहे. समाजातील उपेक्षित घटकांना समाजाच्या उच्च स्तराच्या घटकांपर्यंत आणण्याचे काम आम्ही करत आहोत व ती शपथ आपण सर्वांनी घेतलेली आहे असे आमदार राहुल कुल म्हणाले.
दौंड नगरपालिका आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाच्या माध्यमातून, महिला बचत गट वस्तूंचे विक्री, प्रदर्शन व खाद्य महोत्सवाचे उद्घाटन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतेवेळी ते बोलत होते. यावेळी मा.नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे ,नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष टेंगले,ऍशवूड मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ. फिलोमन पवार,मा. नगरसेवक बबलू कांबळे, शहानवाज पठाण, बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
राहुल कुल पुढे म्हणाले की, दौंड याआधी किती मागे राहिले त्यापेक्षा ते किती गतीने पुढे जाता येईल या दृष्टीने आपण सर्वांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. मी मागच्या गोष्टीवर रडत बसण्यापेक्षा पुढे जाणे पसंत करतो आणि त्यामुळे दौंड मध्ये काय झाले नाही यावर चर्चा करण्यापेक्षा काय केले पाहिजे यावर आम्ही चर्चा करतो व त्यादृष्टीने विकास कामे करतो आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या माध्यमातून या दौंडचा परिसर सर्व सुविधांनी युक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले अर्थकारण मजबूत व्हावे, आपला भाग विकसित व्हावा हाच आपला प्रयत्न आहे.
शहरातील दौंड पोलीस स्टेशनसाठी सात कोटी रुपये निधी देण्यात आला आहे, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी जवळपास 46 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून शहरात देण्यात आला आहे आणि असे हे पहिल्यांदाच घडत आहे. इतरही विकास कामांच्या माध्यमातून विविध योजना आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. दौंड नगरपालिकेला इमारत नाही, त्यासाठी दौंड मध्ये नगरपालिकेची भव्य इमारत व्हावी असा प्रयत्नही सुरू आहे. अशा पद्धतीने दौंड शहर सर्व सुविधांनी युक्त व्हावे यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. सार्वजनिक सुविधा जशा आवश्यक आहेत तशा केंद्र व राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आपण प्रयत्न केला आहे.
सर्व योजनांची माहिती लोकांना या ठिकाणी मिळावी असे नियोजन करण्यात आले आहे. हे सर्व करीत असताना सर्वसामान्य गरजू लोकांपर्यंत या योजना पोहोचल्या पाहिजेत असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या परिसरातील नागरिक या ठिकाणी पोहोचतील व त्यांना जे शासनाला अपेक्षित आहे ती मदत करता येईल यासाठी काम करावे अशा प्रकारची अपेक्षा राहुल कुल यांनी यावेळी व्यक्त केली व या उपक्रमाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षाही राहुल कुल यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे चांगल्या पद्धतीने आयोजन केल्याबद्दल नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष टेंगले यांचे विशेष आभार राहुल कुल यांनी मानले.
आमदार राहुल कुल शहर व तालुक्याच्या विकासासाठी कसा झगडा करीत आहेत, व कोट्यावधींचा निधी कसा आणत आहेत याची वस्तुस्थिती प्रेमसुख कटारिया यांनी उपस्थितांसमोर मांडली. न.पा.चे मुख्याधिकारी संतोष टेंगले यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली. ऐशवूड मेमोरियल हॉस्पिटलच्या (मिशन हॉस्पिटल) प्रांगणातिल या महोत्सवामध्ये महिला बचत गटांचे 25 स्टॉल्स आहेत. महोत्सवाला दौंडकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.