काय कुल-थोरात यांच्यातील विळ्या भोपळ्याचे वैर संपले..! ते व्हिडीओ आणि फोटो मागील सत्य अखेर उघड, वाचा माजी आमदार रमेश थोरात काय म्हणाले

अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात आणि विद्यमान आमदार राहुल कुल यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे संपूर्ण जिल्ह्याला परिचित आहे. हे नेते एकदुसऱ्यावर बोलण्याची एकही संधी सोडत नाहीत मात्र असे असले तरी आज अचानक या दोघांचे एकत्रित व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आणि संपूर्ण तालुक्यातील राजकीय आणि सर्वसामान्य नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. आणि कसे झाले, कुणी घडवले आणि नेमके कारण काय असे एक ना अनेक प्रश्न सहकारनामाचे वाचक विचारू लागले त्यामुळे सहकारनामा ने थेट माजी आमदार रमेश थोरात यांच्याच माध्यमातून यावरील पडदा उठवला आहे.

काय म्हणाले माजी आमदार रमेश थोरात
सोशल मिडियावर व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताच अनेकांना याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली होती. याबाबत माजी आमदार रमेश थोरात यांनी माहिती देताना, आपण विधानभवन येथे मंत्री आणि आमदारांना मुलाच्या लग्न पत्रिका देण्यासाठी गेलो होतो. यावेळी मी, दिलीप मोहिते पाटील, दत्ता मामा भरणे असे सोबत  होतो. सर्वांना भेटत भेटत जात असताना अचानक राहुल कुल समोर दिसले त्यामुळे त्यांनाही लग्नाची निमंत्रण पत्रिका दिली. त्यावेळी त्यांनीही चहा घेऊन जाण्याचा आग्रह केल्याने आम्ही तेथे काहीवेळ  थांबून पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झालो अशी प्रतिक्रिया माजी आमदार रमेश थोरात यांनी दिली.

व्हिडीओ

नुकतीच दौंड तालुक्यात प्रांत कार्यालयाचे उदघाटन महसूल मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते त्यावेळी विद्यमान आमदार राहुल कुल यांनी बोलताना माजी आमदार रमेश थोरात यांच्यावर टिका केली होती तर त्यांच्या टिकेला माजी आमदार रमेश थोरात यांनी उत्तर दिले होते. हे सर्व होत असताना आज अचानक या दोन्ही नेत्यांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये खरी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली होती.