सुधीर गोखले
सांगली : सध्याच्या माहिती तंत्रज्ञान युगामध्ये आता आपली सर्वांची एसटी नेहि कात टाकत ‘हम भी किसी से कमी नही’ चा नारा दिला आहे. एसटी मध्ये क्यू आर कोड प्रणालीचा अवलंब करत तिकीट विक्री सुरु करण्यात आली असून राज्यातील सर्व आगारांमधून आता हि प्रणाली अवलंबली जाणार आहे.
सांगली विभागाचे नियंत्रक सुनील भोकरे यांनी सहकारनामा शी संवाद साधताना याबाबत अधिक माहिती दिली, ते म्हणाले सध्या जगामध्ये कॅशलेस व्यवहार होत असताना आपली एसटी कशी मागे पडेल, राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी तिकीट विक्री बरोबर क्यू आर कोड ची सोय उपलब्ध करून दिली आहे तसेच आरक्षणासह आणखी काही सुविधा दिल्या आहेत त्या टप्प्या टप्प्याने राबवल्या जातील.
पेमेंट साठी महामंडळाचे खास अॅप
प्रवाशांच्या सोईसाठी महामंडळाने एक खास अॅप उपलब्ध करून दिले आहे. या नव्या अॅपमध्ये प्रवाशांना डेबिट क्रेडिट कार्ड बरोबरच सर्व प्रकारचे पेमेंट ऑप्शन देण्यात आले आहेत. ज्यामध्ये गुगलपे, फोनपे, अमेझॉन पे, अश्या कोणत्याही विविध अॅप ने पैसे भरता येणार आहेत. तसेच प्रवाशांना त्यांनी आरक्षित केलेल्या एसटी चे लाईव्ह लोकेशनही समजणार आहे. त्यामुळे बस स्थानकांवर बसेस साठी आता ताटकळत थांबावे लागणार नाही. या कॅशलेस सुविधेसाठी सांगली विभागाकडे नव्याने अँड्रॉइड च्या १६०० मशिन्स आल्या असून सध्या प्रवाशांकडून तिकिटे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने पेमेंट घेऊन वितरित केली जात आहेत. सध्या प्रवाशांचा प्रतिसादही बऱ्या प्रमाणात आहे. भविष्यात नक्की मोठ्या प्रमाणावर हि सुविधा प्रवाशांमध्ये लोकप्रिय होईल यात शंका नाही.
सध्या जर कोणताही व्यवहार अपयशी झाला तर प्रवाशांनी एअरटेल कंपनीसाठी ४०० तर अन्य कंपन्यांसाठी ८८००६८८००६ या क्रमांकावर संपर्क करावा. सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांमधून महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली असून या कॅशलेस सुविधेमुळे सुट्टया पैशांचा घोळ संपणार आहे.