अब्बास शेख
दौंड : दौंड चे विद्यमान आमदार राहुल कूल यांनी काल प्रांत कार्यालयाच्या उदघाट्नानंतर माजी आमदार रमेश थोरात यांच्यावर टिका केली होती. मी इतकी कामे करतो मात्र तरीही समोरच्या (रमेश थोरात) यांना विधानसभेला 1 लाख 2 हजार मते पडली आणि मला 1लाख तीन हजार मते पडून मी 700 मतांनी निवडून आलो. समोरच्या व्यक्तीने अशी काय कामे केली आहेत किंवा असे काय केले आहे की त्यांना इतकी मते पडतात अशी टिका त्यांनी माजी आमदार यांच्यावर केली होती. त्यांच्या या टिकेला आता माजी आमदार रमेश थोरात यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
माजी आमदार रमेश थोरात यांनी 25 विरुद्ध 5 वर्षांचा लेखाजोखा मांडला
माजी आमदार रमेश थोरात यांच्यावर टिका करण्यात आल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीत कोणकोणती महत्वाची कामे केली याचा लेखाजोखा मांडला आहे. थोरात यांनी त्यांच्यावर झालेल्या टिकेबद्दल पत्रकारांशी बोलताना, ज्या ठिकाणी हे काल उदघाटन करायला गेले होते ती सेंट्रल बिल्डिंग माझ्या काळात बांधली. तीच्या उदघाट्नाला माननीय अजितदादा आले होते याचाही विसर विद्यमान आमदारांना पडलेला दिसतोय असे सांगितले. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली दौंडची कुरकुंभ मोरी यांना 25 वर्षांत करता आली नाही ती मी माझ्या काळात जेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन, उदघाटन करण्यात येऊन अखेर ते पूर्णत्वास गेले. मात्र हे आडवी कशी मारतात याचे उदाहरण देताना थोरात यांनी काही घडामोडी सांगितल्या, त्या कामासाठी आमच्या मागणीवरून महाराष्ट्र शासनाकडून अजितदादा पवारांनी 21 कोटी रुपये मंजूर करून ते दौंड परिषदेमध्ये जमा केले. काम सुरु झाले, आतपर्यंत खोलीकरण झाले असताना आणि सर्व काम सुरळीतपणे सुरु असताना दादांनी जमा केलेले पैसे यांनी रेल्वेला वर्ग केले नाही त्यामुळे त्यांनी काम बंद ठेवले. पण आम्ही सतत पाठपुरावा केला, मी, खासदार सुप्रिया सुळे यांसह येथील अनेक कार्यकर्त्यांनी नगरपरिषदे समोर धरणे आंदोलन करून अखेर ते काम पूर्ण करून घेतलेच आणि खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उदघाटन केले हेही विद्यमान आमदार विसरले असे दिसतेय असे त्यांनी म्हटले.
याला आम्ही विकास कामे म्हणतो, ते काय म्हणतात माहित नाही.. विद्यमान आमदारांच्या घरात 25 वर्षे आमदारकी होती पण मी आमदार झाल्यानंतर दौंड शहरात 25 कोटींची अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन करून घेतली. शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा, शहरात अंडरग्राउंड केबल करून घेतली. पाटस ते सिद्धटेक रस्ता आणि विस्तारीकरण माझ्या काळात करून घेतले. वडगांव दरेकर, नानगाव, वाळकीचे पूल मी माझ्या काळात करून घेतले. 4 सबस्टेशन केले. 2700 अॅडीशनल डिप्या बसविल्या, अशी कित्येक कामे केली आहेत पण त्याची टिमकी वाजवत बसलो नाही त्यामुळे यांना माझ्या कामांचा विसर पडला आहे. त्यांनी माझ्यासारखे मुद्देसूद एकही मोठे काम सांगावे जे त्यांनी केले आहे असे थोरात म्हणाले. राहिला प्रश्न रस्त्यांचा तर तर ते होतच असतात, त्यासाठी वेळोवेळी फंड हा उपलब्ध असतो. मी जे वर सांगितले त्याला आमच्या भाषेत विकासाची कामे म्हणतात. त्यांच्या भाषेत काय म्हणतात माहित नाही असा उपरोधक टोला त्यांनी लगावला.
माझ्यावर टिका करताय, पण स्वतः काय केले हे पहा
माजी आमदार रमेश थोरात यांनी कूल यांच्या त्या टिकेला उत्तर देताना, हे माझ्यावर टिका करतात की मी काय केले मात्र यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे की यांनी काय केले आहे.. यांनी कारखाना बंद पाडला आणि चालवायला दिला कर्नाटक वाल्यांना, यांनी स्वतःचा दूध संघ बंद पाडला आणि चालवायला दिला अमूल ला, यांनी स्वतःच्या गावातील सोसायटी बंद पाडली, राहू गावची विकास सोसायटी गेली 2-3 वर्षे बंद आहे. 9 कोटी तोट्यात आहे. त्यांच्याकडे महाविद्यालय आहे आणि माझ्याकडेही महाविद्यालय आहे. राहू हे खुटबाव पेक्षा 5 पट मोठे आहे. माझ्याकडे 3500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्याकडे मात्र 1400 विध्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि तेथील 350 विध्यार्थी माझ्या गावात शिकायला येतात हा फरक लपणारा नाही असे त्यांनी म्हटले आहे. केडगाव आणि विविध गावांत मी केलेली कामे, केडगावच्या कॅनॉलच्या बाजूने बायपास रस्ता करून अवजड वाहतुकीचा आणि भार कमी केला आहे. अशी अनेक दर्जेदार कामे आणि त्यांचा दर्जाही आम्ही आमच्या काळात जपला आहे. त्यामुळे लोक आमच्यावर का खुश आहेत आणि तुमच्यावर का नाराज आहेत हेही कालच्या गर्दीवरून तुम्हाला समजले असेल असा टोला त्यांनी लगावला आहे. मला म्हणतात यांच्या मोर्चाला पाच पंचवीस लोक होते, थोडे व्हिडीओ चेक करून पहा म्हणजे सर्व लक्षात येईल असे त्यांनी सांगितले.
एकंदरीतच विद्यमान आमदार राहुल कूल यांनी माजी आमदार रमेश थोरात यांच्यावर काल टिका केल्याने आज माजी आमदार रमेश थोरात यांनीही त्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे आणि तुम्ही जे आरोप कराल त्याला त्याच पद्धतीने सडेतोड उत्तर दिले जाईल असेच त्यांनी आज जाहीर केले आहे.