केडगाव | मेंढपाळावर आभाळ फाटले, बिबट्या सदृश प्राण्याच्या हल्ल्यात 11 मेंढ्यांचा मृत्यू, 10 जखमी

अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे एका मेंढपाळ परिवारावर मोठे संकट आले असून त्या कुटुंबावर जणू आभाळच फाटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाऊ तुकाराम शिंदे असे या मेंढपाळाचे नाव असून त्यांच्या खांडातील 11 बकरी ही अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडली असून 10 च्या पुढे जखमी झाली आहेत अशी माहिती त्यांनी दिली. हा हल्ला बिबट्या सदृश प्राण्याने केला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दुपारच्या वेळेस हल्ला झाल्याने मोठी हानी झाली.. भाऊ शिंदे यांची ही बकरी केडगावच्या 22 फाटा परिसरातील गायकवाड वस्ती येथे एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये बसविण्यात आली होती. दुपारी 1:15 च्या आसपास ते सर्व बकऱ्यांना जाळीमध्ये कोंडून आपल्या कामानिमित्त काही वेळ बाहेर गेले होते. ते पुन्हा आपल्या बकऱ्यांजवळ आल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांच्यासमोर सात बकरी ही मृत्युमुखी पडली होती तर चार ते पाच बकरी ओढून नेण्यात आली होती.

अश्या पद्धतीने जखमी बकऱ्यांवर उपचार सुरु झाले.. या बकऱ्यांची पाहणी केली असता मृत्युमुखी पडलेल्या बकऱ्यांच्या गळ्याला अज्ञात प्राण्याचे दात लागल्याचे तर जखमी बकऱ्यांचे पाय लचका घेऊन तोडण्यात आल्याचे दिसत होते. यावेळी संबंधित मेंढपाळाने सहकारनामा संपादक अब्बास शेख यांना फोन करून माहिती दिल्यानंतर त्यांनी पासुवैद्यकीय अधिकारी चैत्राली मॅडम यांना संपर्क साधला. त्यावेळी आपण सुट्टीमुळे बाहेर असून जखमी बकऱ्यांवर त्वरीत उपचार करण्यासाठी मदत पाठवत असल्याचे सांगितले. जखमी बकऱ्यांवर उपचार करण्यासाठी डॉ.झाडे हे पोहचले असून त्यांच्याकडून उपचार सुरु करण्यात आले आहेत.

मेंढपाळाला आर्थिक मदत मिळण्याची गरज अतिशय बिकट परिस्थितीतून आपल्या कुटुंबाची गुजरान करणाऱ्या भाऊ शिंदे यांच्या कुटुंबावर या हल्ल्यामुळे मोठा आघात झाला आहे. बकऱ्यांच्या जन्मापासून ते पूर्ण वाढीपर्यंत त्यांच्या संगोपणात मोठे कष्ट घ्यावे लागतात. आपले घरदार सोडून या मेंढ्यांना गावोगावी घेऊन फिरावे लागते. तश्यातच हातातोंडाशी आलेला घास हिरवावा असे काही झाले तर त्या कुटुंबाचे संपूर्ण आर्थिक गणितच बिघडून जाते. त्यामुळे या प्रसंगामध्ये शासनाने आर्थिक मदत देऊन भाऊ शिंदे यांच्या कुटुंबाची मदत करावी अशी मागणी होत आहे.