दौंड : सहकारनामा ऑनलाईन
सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे ती फक्त कोरोना विषाणू आणि त्यावरील उपयांबाबत. कोरोना विषाणूवर अजून तरी ठोस अशी लस सापडली नसली तरी मात्र खबरदारी घेतल्यास त्यापासून आपण नक्कीच दूर राहू शकतो. याबाबत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दौंडच्या सध्य स्थितीवर माहिती दिली असून दौंड तालुक्यातील करोना आजराबाबतची परिस्थिती सध्या हातात असली तरी नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. कुल यांनी बोलताना संचार बंदीच्या काळात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त करत दौंड तालुक्यातील कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आढावा घेवून याबाबत तालुक्यातील आठ नागरिकांना करोना झाल्याचा संशयामुळे त्यांना तपासणीसाठी पुणे येथे पाठविले होते. यातील चार जणांना कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत नसल्याने त्यांची कोणतीही तपासणी केली नाही. मात्र उर्वरित चार जणांची तपासणी केल्यानंतर त्यांचा अहवालही निगेटिव्ह आला आहे . तालुक्यातील 4327 नागरिकांना होमक्वारंटाईन करण्यात आले होते. यातील ज्यांचा
होमक्वारंटाईनचा 14 दिवसांचा कालावधी झाला आहे त्यांना आत्ता यातुन वगळले असून आता फक्त 2713 नागरिक होमक्वारंटाईन आहेत . त्यामुळे निश्चितच दौंड तालुक्यात सद्या एकही रुग्ण नसल्याचे त्यांनी माहिती दिली आहे. मात्र तरीही नागरिकांनी स्वतःची काळजी घेऊन प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात असे आवाहन त्यांनी केले आहे .
तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागाच्या दोन वेळा बैठका घेवून करोना विरोधी लढण्याबाबत नियोजन केलेले आहे. तसेच सातत्याने आपण प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांच्या संपर्कात आहे.
तालुक्यातील या संचार बंदीच्या काळात अनेक गरजूंना अत्यावश्यक सेवेबाबत येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे त्या नागरिकांची कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी ” वर्क फ्रॉम होम ” ह्या संकल्पनेनुसार नागरिकांसाठी हेल्पलाइन नंबर (7038667799 ) उपलब्ध करून दिला असून यावर येणाऱ्या प्रत्येक समस्येचे निराकरण आपण स्वतः करत असल्याचे सांगितले. नागरिकांना कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास त्या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहनही आ.कुल यांनी केले आहे.