‘पंच्याहत्तरी’ ओलांडलेल्या आजीबाईंच्या गुडघ्यावरील किचकट शस्त्रक्रिया ‘यशस्वी’, डॉ.खवटे यांच्या विशेष प्रयत्नातून आजीबाई चालू लागल्या

दौंड : दौंड मधील खेडगीकर आजींना गुडघे दुखीचा भयंकर त्रास होता. आजींना उभे राहणे मुश्किल झाले होते, उभेच राहता येत नसल्याने त्रास आणखीनच वाढत चालला होता. दोन वर्षापूर्वी पुणे येथील खाजगी हॉस्पिटलने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिलेला होता, परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शस्त्रक्रिया लांबणीवर पडली. काही दिवसांपूर्वी आजींना पुणे,बारामती, लोणी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. परंतु आता वयोमानानुसार शस्त्रक्रिया करणे फार कठीण आहे असे येथील डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यामुळे काय करावे असा प्रश्न खेडगीकर कुटुंबापुढे उभा राहिला होता.
दरम्यान खेडगीकर आजींचा नातू मयूर याने त्यांचे मित्र डॉ.रोहन खवटे (ऑर्थो) यांची भेट घेतली व त्याने आपल्या आजींच्या त्रासाविषयी डॉक्टर रोहन यांना माहितीदिल्यानंतर डॉक्टरांनी आजींना आपल्या दवाखान्यामध्ये आणण्यास सांगितले. डॉक्टरांनी आजींचे पूर्वीचे सर्व रिपोर्ट पाहून आम्ही आजींच्या गुडघ्यांची यशस्वी शस्त्रक्रिया करू असे सांगितले व त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याची जबाबदारी डॉ.रोहन खवटे, डॉ.किरण खवटे, डॉ.संध्या खवटे व डॉ.संपदा खवटे यांनी स्वीकारली. पुढील चारच दिवसांमध्ये शस्त्रक्रियेची तारीख ठरली. तब्बल साडेचार तास शस्त्रक्रिया चालली. ऑपरेशन थिएटर मधून बाहेर पडताच डॉक्टर रोहन यांनी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याचे सांगितले. शस्त्रक्रियेनंतर चार-पाच दिवसांमध्ये आजी स्वतः चालू लागली आहे. डॉ. खवटे कुटुंबीय अगदी देवदूता सारखे आमच्या आजींच्या मदतीला धावून आले असल्याची प्रतिक्रिया खेडगीकर यांनी दिली. मा.नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे यांनी डॉक्टर खवटे कुटुंबीयांची भेट घेत त्यांचा सत्कार केला. यावेळी मयूर व विद्या खेडगीकर यांनी डॉ.खवटे परिवाराचे आभार मानले.