|सहकारनामा|
दौंड : दौंड तालुक्यातील अनाजी खाडे बालकाश्रम गलांडवाडी येथे निराधार बालकांना राख्या बांधल्या. खुटबाव येथील शुभांगी पायगुडे, धनश्री पायगुडे व अर्चना पायगुडे या भगिनी गेल्या ७ वर्षापासून नित्याने येथील अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना राखी बांधतात.
आई इंदूबाई व वडील लक्ष्मण पायगुडे
यांच्या स्मृती व शिकवणीतून या तीन भगिनी दरवर्षी राखी बांधतात. आईवडील नसल्याचे दुःख काय आहे हे आम्ही जवळून अनुभवले आहे. शुभांगी पायगुडे या भैरवनाथ विद्यालयात लिपिक म्हणून काम करीत असून अर्चना पायगुडे या शिक्षक आहेत. तर तिसरी बहीण पुणे येथे संगणक अभियांत्रिकीची नोकरी करीत आहे. गलांडवाडी येथे अनाथ विद्यार्थ्यांचे संगोपन खंडेराव खाडे व प्रमिला खाडे हे कुटुंबीय गेल्या २१ वर्षांपासून शासकीय अनुदानाविरहित करीत आहेत.
हे विद्यार्थी दरवर्षी रक्षाबंधनला आमची वाट बघत असतात. आम्हीही त्यांच्याशी सख्ख्या बहिणी इतका आधार देतो. आम्हाला भाऊ नाही असे कधीही वाटत नाही. त्यांनी याच बालकांना आमचे भाऊ मानले आहे. हे बालक आम्हाला देखील अगदी बहिणीला ज्या हक्काने अडचणी सांगतात त्या हक्काने ते आम्हाला सुद्धा त्यांच्या अडचणी सांगतात.
अडचणी सोडल्यावर किंवा त्यांच्या मदतीला आल्यावर एक वेगळाच आनंद होतो. आम्ही यापुढेही दरवर्षी या बालकांना राख्या बांधू असे शुभांगी पायगुडे यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे सचिव बापू बडे, सचिन बोरकर व संस्थेतील सर्व अनाथ बालक उपस्थित होते.