दौंड शहरात 58 कोटी रुपयांच्या विकास कामांचे आ.राहुल कुल यांच्या हस्ते भूमिपूजन, लाडक्या बहिणींनी राख्या बांधून केले स्वागत

दौंड : आमदार राहुल कुल यांच्या हस्ते शहरातील 58 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. येथील प्रभाग क्र. 10 मधील तब्बल 21 कोटी रुपयांच्या विकास कामांचा यामध्ये समावेश आहे. या प्रभागातील महिलांनी आमदार राहुल कुल यांना राख्या बांधित त्यांचे स्वागत केले, त्यांनी प्रभागात केलेल्या विकास कामांबाबत आभारही मानले.

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, भाजपा पक्षाचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे, मित्र पक्षांचे पदाधिकारी तसेच कुल -कटारिया गटाचे आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. भाजपा, आरपीआय, पीआरपी, नागरिक हित संरक्षण मंडळ तसेच प्रभाग क्रमांक 10 मधील भुइटेनगर येथील चैतन्य मित्र मंडळ, नवरात्र मित्र मंडळ व जय हनुमान सेवा मित्र मंडळाच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार राहुल कुल यांनी आपल्या भाषणातून शहर व तालुक्यात केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांची माहिती दिली. ते म्हणाले की विकास कामांबाबत मला प्रश्न विचारले मला आनंद झाला, तो तुमचा अधिकारच आहे. मी काम केले आहे हे मी अभिमानाने सांगत आहे. कोरोना कालावधीमध्ये कोणीही उपलब्ध नसताना फक्त आम्ही आणि आमचे सर्व सहकारी लोकांना दिलासा देत होतो.

ग्रामीण रुग्णालयापासून इतर खाजगी दवाखान्यात सुद्धा औषधे कमी आहेत का? ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित होतो आहे का? ही व्यवस्था आम्ही पाहत होतो. आता तुम्ही मागच्या तीन निवडणुकांमध्ये ज्यांना मते दिली आहेत त्यांनी या शहरासाठी नेमके काय केले आहे हा प्रश्न सुद्धा ते तुमच्याकडे आल्यानंतर विचारला तर मला खूप मोठा आनंद होईल अशी कोपरखळी ही कुल यांनी यावेळी मारली.