महामारीत सुद्धा कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस पाटलांना 50 लाखांचे कोरोना ‛विमा कवच’ द्यावे : आ.राहुल कुल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना (कोव्हीड १९) महामारीचा प्रादुर्भाव वाढत असून वाढ़ता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाने गावपातळीवर समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये गाव कामगार पोलीस पाटील हे सदस्य / सचिव म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहेत. हे कर्तव्य बजावत असताना जळगाव जिल्ह्यातील चार पोलीस पाटलांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झालेला आहे. 

सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग महाराष्ट्रात वेगाने फैलावत आहे. यात पोलीस पाटील आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असल्यामुळे त्यांना ५० लाख संरक्षण विम्याचे कवच लागू करण्याची मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केलेली आहे.

तसेच कोरोना (कोव्हीड १९) अंतर्गत काम करणाऱ्या गाव कामगार पोलीस पाटील यांना ५० लाख रुपये विमा संरक्षणामध्ये समाविष्ट करणेबाबत सरकारकडून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडे त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.