दौंड : सहकारनामा
दौंड तालुक्यामध्ये सध्या बिबट्याने थैमान घातले आहे. दररोज कुठे न कुठे बिबट्याच्या हल्ल्यात प्राणी मारले जाऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे.
आज दि.12 जानेवारी रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास वरवंड येथील टेंगले वस्तीवर बिबट्याने संभाजी नामदेव टेंगले यांच्या बकऱ्यांच्या कळपावर अचानक हल्ला करून 5 बकरे ठार केले तर 2 बकरे या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
बिबट्याच्या या हल्ल्यामुळे नामदेव टेंगले या शेतकऱ्याचे जवळपास एक लाख रुपयांपेक्षा जास्त असे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला त्वरित शासनाकडून भरपाई मिळावी अशी विनंती शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
या परिसरात बिबट्याचा वावर हा मोठ्या प्रमाणावर वाढला असून या बिबट्याला त्वरित न पकडल्यास मोठी अघटित घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, कोरोना संकट अजूनही डोक्यावर आहे त्यामुळे अगोदरच मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी आता या अश्या मोठ्या नुकसानिमुळे पुरता मेटाकुटीस आला आहे. वन विभागाकडून या भागात पिंजरा लावून त्वरित या बिबट्याला पकडण्याची मागणी जोर धरत आहे.