जमीन विक्रीस नकार देणाऱ्या महिला आणि तिच्या कुटुंबियांना 5 जणांकडून मारहाण, दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल



|सहकारनामा|

दौंड : जमीन विक्रीसाठी लागणारी सही देत नाही म्हणून दौंडमधील सरपंच वस्ती येथील महिलेस व तिच्या कुटुंबीयांना  मारहाण करण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अर्चना किशोर ढमे (रा. दत्त पुष्पा बंगला, ढमे चाळ, सरपंच वस्ती दौंड) यांनी फिर्याद दिली असून राहुल राजेंद्र गायकवाड, राजेंद्र शहाजी गायकवाड, दर्शना राजेंद्र गायकवाड, गणेश सुभाष शेळके, शेवंता सुभाष शेळके ( सर्व रा.चिंबळ, श्रीगोंदा,जि. अहमदनगर) यांच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 12 ऑगस्ट रोजी आरोपींनी फिर्यादी यांच्या घरात घुसून, आम्हाला कोपरगावची जमीन विकायची आहे, त्याकरिता तू सही दे, अशी मागणी केली यावेळी फिर्यादी यांनी आरोपींना तुम्ही नारायण गव्हाण येथील जमीन मला फसवून विकली आहे, मी आता सही देणार नाही असे सांगितले. त्यामुळे चिडून सर्व आरोपींनी मिळून फिर्यादी यांना मारहाण केली. 

फिर्यादी यांचे पती व कुटुंबीय  मदतीसाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ, दमदाटी करीत काठी व पट्ट्याने मारहाण करण्यात आली. दौंड पोलिसांनी आरोपीं विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली.