बारामती : बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथील शेतकऱ्याची सोसायटीच्या सचिवाने ताडजोडीतील कर्जाची 4 लाख 15 हजार रुपये घेऊन ती बँकेत न भरता स्वतः वापरून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी भरत बाबासो जगताप (वय 61,व्यवसाय शेती, रा.उंडवडी सुपे ता.बारामती) यांच्या फिर्यादीवरून अनिल ज्ञानदेव दळवी (रा. गणपती मंदिर, मेडद ता.बारामती जि.पुणे) या सचिवावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी भरत जगताप यांनी सन 2003 साली उंडवडी सुपे विविध वि. कार्यकारी सोसायटी यांचे मार्फतीने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडुन 4 लाख 15 हजार रुपये
मध्यम मुदत व पिक कर्ज घेतले होते व त्यांचे हप्ते वेळो वेळी बँकेत जमा करीत होते. त्यांनतर त्यांचे घरगुती अडचणीमुळे ते कर्जाचे हप्ते भरू शकले नाही. त्यामुळे त्याचेवर व्याजाची रक्कम व मुद्दल असे मिळुन 6 लाख रूपये कर्ज झाले होते. उंडवडी सुपे विविध कार्यकारी सोसायटी यांचे सोबत तडजोड करून त्याची तडजोड रक्कम 4 लाख 15 हजार रुपये झाली असता यातील आरोपी अनिल दळवी (सचिव, उंडवडी सुपे विविध कार्यकारी सोसायटी) यांनी तुम्ही सर्व पैसे माझ्याकडे द्या मी सोसायटीमध्ये भरतो व कर्ज बाकी नसलेचा दाखला देतो असे म्हणून सर्व पैसे घेऊन कर्जबाकी नसलेचा दाखला दिला. त्यानंतर फिर्यादी यांनी ऑगस्ट 2021 मध्ये पी.डी.सी.सी बँकेत जावुन तपासनी केली असता त्यांचे बँकेतील कर्जखात्यात सचिवाने कोणतीही रक्कम न भरता स्वत: वापरून फिर्यादीस सोसायटीचा कर्ज बाकी नसलेबाबतचा खोटा दाखला देवुन फसवुक केली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करत आहेत.