पानवली : ऊसतोड कामगार देतो, लग्नासाठी व कामासाठी अगोदर उचल द्या असे म्हणून चार जणांनी मंगेश देविदास कांबळे (रा.पानवली,ता.दौंड) या शेतकऱ्याची तब्बल 5 लाख 10 हजार रुपये उचल घेऊन पसार होत फसवणूक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी कांबळे यांना उसतोड कामगार लागत असल्याने आरोपी सुभाष नरसिंग चव्हाण, अरुण सुभाष चव्हाण, जयवंत सुभाष चव्हाण व प्रवीण शांताराम राठोड (सर्व रा. आनंदनगर, तांडा, लिपाना ता.एरंडोल जि.जळगाव) यांनी आम्ही कामगार देऊ मात्र आम्हाला उचल द्या असे म्हणून काही कामगार देऊन 5 लाख 10 हजार रुपये उचल घेतली होती यात कामगारांचा पगार 60 हजार होऊन उचल 4 लाख 50 हजार ही बाकी होती. मात्र आरोपी हे दि. 26 नोव्हेंबर रोजी पहाटे 4:00 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांना उरलेले पैसे न देता पळुन गेले. त्यानंतर फिर्यादी यांनी वेळोवेळी फोनवरुन सदर नमुद आरोपी यांना तुम्ही माझेकडुन कामासाठी व लग्नासाठी घेतलेल्या उच्चल 5 लाख 10 हजारातून तुमचे कामाचे 60 हजार रुपये कट करुन माझे 4 लाख 50 हजार रुपये द्या नाहीतर माझेकडे कामास या असे फोनवरुन वेळोवेळी सांगितले असता आरोपींनी फिर्यादीला आम्ही तुमचे पैसे देणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा. असे म्हणुन फिर्यादी यांचे लग्नासाठी व कामासाठी घेतलेली रक्कम न देता फिर्यादी यांचा विश्वासघात करुन फसवणुक केली असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यामुळे त्यांनी यवत पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध रीतसर फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कदम करीत आहेत.