बारामती : आगामी अर्थसंकल्पामध्ये वैद्यकीय क्षेत्रासाठी भरीव निधीची तरतूद करून नागरिकांना उत्तम आरोग्यविषयक सोई-सुविधा देण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न असेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
बारामती येथील नवनिर्मित अत्याधुनिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाच्या दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, दूरदृश्यप्रणालीद्वारे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, खासदार सुप्रिया सुळे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन परिषदेचे आयुक्त वीरेंद्र सिंह, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर हे उपस्थित होते.
बारामती येथे शासनाकडून आरोग्य विषयक सोई-सुविधा वाढविण्याचा प्रयत्न आहे असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, येथे असलेल्या शासकीय तसेच खासगी आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणामुळे बारामती व परिसरातील नागरिकांचा फायदा होणार आहे. भारतीय आयुर्वेद मानकानुसार बारामती येथे २०२२-२३ मध्ये शासकीय आयुर्वेद महाविद्यालयही उभारण्यात येणार आहे.
येथील आरोग्य संस्थांचे बांधकाम व श्रेणीवाढ करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. जिल्हा शासकीय रुग्णालयात कोविडपश्चात त्रास होणाऱ्यांसाठी समूपदेशन केंद्र सुरु करण्यात येणार आहे. कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना याचा फायदा होईल.
प्रजासत्ताक दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा देत ते म्हणाले, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषित झालेल्या पद्म पुरस्कारामध्ये राज्यातील चार पद्म पुरस्कार वैद्यकीय क्षेत्राला मिळाले असून यामुळे आपल्याला राज्याच्या वैद्यकीय प्रगतीची कल्पना येते. डोंगरी, आदिवासी भागात आवश्यक सर्व आरोग्य सुविधा पुरवण्यास शासनाचा प्राधान्यक्रम असेल. एकही नागरिक आरोग्यसेवेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. सर्वांनी मिळून उत्तम निरोगी पिढी घडविण्यासाठी उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध कराव्यात, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले, कोरोनाच्या काळात वित्त विभागाने आरोग्यविषयक सोई-सुविधांकरिता निधी कमी पडू दिला नाही. यामुळे कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यास चांगली मदत झाली आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व पदांच्या पदभरतीला मान्यता मिळाली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोग व निवड मंडळामार्फत भरती प्रकिया राबविण्यात येत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालय राज्यातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकात म्हस्के यांनी प्रस्ताविक करुन रुग्णालयातील कामकाजाची माहिती दिली.
यावेळी बारामतीचे प्रांतधिकारी दादासाहेब कांबळे, पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, वैद्यकीय महाविद्यालय अभ्यागत समितीचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राध्यापक, सहा. प्राध्यापक आदी उपस्थित होते.