Haveli (Pune) | 3 लाख 50 हजार रुपयांच्या बदल्यात उकळले 41 लाख रुपये, पुणे जिल्ह्यात ‛खाजगी सावकारी’चा भयानक प्रकार उघड

हवेली : पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील शिवापूर येथे खाजगी सावकारीचा एक भयानक प्रकार उघडकीस आला असून एका दुकानदाराकडून 3 लाख 50 हजार रुपयांच्या व्याजापोटी सुमारे 41 लाख रुपये उकळले असल्याचे समोर आले आहे. याबाबत दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार
फिर्यादी मंगेश उत्तम घोलप (रा.शिवापूर, ता.हवेली जि. पुणे) यांना आरोपी सुशील ज्ञानेश्वर रोकडे व गणेश ज्ञानेश्वर रोकडे (दोघे रा. शिवापूर ता.हवेली, पुणे) यांनी व्याजाने 3,50,000 रुपये दिले होते. त्यामुळे आरोपींनी फिर्यादीला तुझे शिवापूर वाडा येथील तुकाईदेवी मटण शॉप हे दुकान आमचे पैसे दिल्याशिवाय उघडायचे नाही असा दम भरत जातीवाचक बोलून पैसे द्यायची तुमची लायकी नाही असे म्हणत शिवीगाळ दमदाटी केली. तसेच फिर्यादीच्या पोटाला पिस्टल लावून जिवे मारण्याची धमकी देत एकूण 18 लाख रूपये रोख आणि फिर्यादीच्या नावावर असलेले शिवापुर येथील दोन फ्लॅट बँकेत
तारण ठेवुन त्याचे 23 लाख रुपये व्याजापोटी स्वतःच्या अकाउंटवर फिरवत फिर्यादीची सुमारे 41 लाख रुपयांची फसवणूक केली.

फिर्यादीला हा गंभीर प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने राजगड पोलीस ठाण्यात धाव घेत आपली फसवणूक करण्यात आल्याची फिर्याद दिली. त्यावरून वरील दोन खाजगी सावकारांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ साडेतीन लाख रुपायांच्या बदल्यात 41 लाख रुपये लुटण्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने शिवापूर भागात खळबळ माजली आहे. या प्रकारामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामिण भागात अजूनही खाजगी सावकारी बंद झाली नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
याबाबत अधिक तपास भोर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे हे करीत आहेत.