दामदुप्पट करण्याच्या नादात महिलेची 40 लाखांची फसवणूक, रोख रक्कम आणि सोनेही लंपास

दौंड : तुमचे पैसे डबल करून देतो असे अमिष दाखवून दौंड मधील एका महिलेची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत आरोपीने महिलेची 15 लाख 48 हजार रु. रोख रक्कम व 19 लाख 50 हजार रुपयांच्या 39 तोळे सोन्याच्या दागिन्यांची अक्षरशः लूट केली आहे. याप्रकरणी श्रीमती सुधा गौरव साळवे (रा. गजानन सोसायटी, दौंड) यांनी फिर्याद दिली असून दौंड पोलिसांनी मोजेस दीपक उजागरे (रा. गजानन सोसायटी ,दौंड) याच्या विरोधात भा.द. वि. कलम 420 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दि.3 ऑगस्ट 2022 ते दिनांक 4 नोव्हेंबर 2022 दरम्यान आरोपीने फिर्यादी यांना पैसे दुप्पट करून देतो असे अमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी 15 लाख 48 हजार रुपयांची रोख रक्कम घेतली. फिर्यादी यांनी आरोपीला आपल्याकडे असणारी सर्व रोख रक्कम दिल्यानंतरही आरोपीकडून त्यांना आपल्या रकमेचा कोणताच परतावा न मिळाल्याने त्यांनी त्याच्याकडे दिलेल्या पैशाची वारंवार मागणी केली असता, तुम्ही मला आणखीन पैसे दिले नाही तर अगोदर दिलेले तुमचे सर्व पैसे बुडतील अशी भीती आरोपीने दाखविली.

त्यावेळी आपल्याकडे असणारे सर्व पैसे संपले आहेत असे फिर्यादी यांनी आरोपीला सांगितले. त्यानंतर तुमच्याकडे जे सोन्याचे दागिने आहेत ते मला द्या. मी ते गहाण ठेवून पैसे आणतो व संबंधितांना देतो म्हणजे तुमचे सर्व पैसे तुम्हाला परत मिळतील असे सांगून आरोपीने पुन्हा एकदा फिर्यादी यांना फसविले. आरोपीने फिर्यादी यांच्याकडून तब्बल 39 लाख 98 हजार रुपये घेऊनही त्यांना कोणताही परतावा किंवा पैसे न देता त्यांची फसवणूक केली आहे.