शेत मजुरास मारहाण करून 40 हजारास लुटले, दौंड पोलिसांनी एका संशयितास घेतले ताब्यात



|सहकारनामा|

दौंड : शहरा जवळील गिरिम हद्दीतील वायरलेस फाटा परिसरामध्ये एका शेत मजुरास चार जणांनी बेदम मारहाण करून पैशाची लूट केली असल्याची घटना घडली. याप्रकरणी शैलेश रमेश कुरी( राहणार गाडीपुरा, तालुका हिंगोली, जिल्हा. हिंगोली) यांनी फिर्याद दिली असून दौंड पोलिसांनी चार अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

दौंड पोलिसांनी तपासाची चक्र फिरवीत 24 तासात एका संशयितास ताब्यात घेण्यात यश मिळविले आहेत. घटनेबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. 24 जुलै रोजी दुपारी 3.30 ते 4.40 वा. च्या दरम्यान फिर्यादी हे मुंबईहून हिंगोलीला जाण्यासाठी येथील नगर मोरी( संत मदर तेरेसा चौक) चौकामध्ये एस.टी.ची वाट पहात थांबले होते. 

त्यावेळी एका अज्ञात इसमाने त्यांना चल तुला एसटी स्टॅंडवर सोडतो असे सांगून आपल्या दुचाकीवर बसविले व गिरिम हद्दीतील वायरलेस फाटा (हॉटेल स्वानंद) परिसरात नेले. त्या ठिकाणी आधीच उभ्या असलेल्या तीन जणांनी मिळून फिर्यादीस बेदम मारहाण केली व त्यांच्याकडील 35 हजार रु. रोख व 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असा 40 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. 

पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणातील आरोपींचा शोध चालू असताना आज दि. 25 जुलै रोजी पोलीस कर्मचारी अमीर शेख, विशाल जावळे, आदेश राऊत, जब्बार सय्यद, अमजद शेख यांच्या पथकाने एका संशयितास ताब्यात घेतले, हा अट्टल गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.