4 आरोपींनी 3 जिल्ह्यात 21 ठिकाणी केली चोरी ! शेतकऱ्यांचे 10 ट्रॅक्टर, 2 पिकअप, 1 बोलेरो, स्कॉर्पिओ, 6 मोटर सायकल, 5 गाई असा 77 लाखांचा मुद्देमाल 4 आरोपींकडून जप्त



|सहकारनामा|

पुणे : 

4 आरोपींनी पुणे, अहमदनगर, सोलापूर या 3 जिल्ह्यात 21 ठिकाणी  शेतकऱ्यांचे 10 ट्रॅक्टर, 2 पिकअप, 1 बोलेरो, स्कॉर्पिओ, 6 मोटर सायकल, 5 गाई असा 77 लाखांचा ऐवज चोरी केल्याची धक्कादायक बाब पुणे ग्रामिण च्या स्थानिक गुन्हे शाखा LCB ने उघडकीस आणली असून या 4 आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शिरूर तालुका, पारनेर तालुका, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरीचे बरेच गुन्हे घडत होते त्याअनुशंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री.डॉ.अभिनव देशमुख, पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस

अधीक्षक श्री. मिलींद मोहीते, बारामती विभाग यांनी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट यांना शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सक्त सुचना दिल्या होत्या.

या सूचनेनुसार पो.नि. घनवट यांनी सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे, फौजदार दत्तात्रय गिरमकर, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, सचिन गायकवाड, दत्तात्रय तांबे, पो.ना.दिपक साबळे, राजू मोमीण, अजित भुजबळ, गुरू जाधव, मंगेश थिगळे, पो.कॉ. संदिप वारे, जितेंद्र मांडगे, अक्षय जावळे यांचे पथक तयार करून तपासकामी रवाना केले होते.

स्थानिक गुन्हे शाखा पथकास शिरूर शहरात राहणारे इसम सतीश अशोक राक्षे, ज्ञानदेव उर्फ माऊली विनायक नाचबोणे व प्रविण कैलास कोरडे हे तिघेही एकत्रात फिरतात ते कोणताही कामधंदा करीत नसून त्यांचेकडे वेगवेगळया ट्रॅक्टर, पिकअप अशा गाडया आणतात त्या चोरीच्या असाव्यात अशी गोपनीय माहीती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथकाने इसम सतीश अशोक राक्षे, (रा. बेलवंडीफाटा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर, सध्या रा. राजमाता बिल्डींग, बाबुरावनगर, शिरूर,ता. शिरूर, जि.पुणे) यास त्याचे राहते घरातून ताब्यात घेतले असता त्याने त्याचे साथिदार 

ज्ञानदेव उर्फ माऊली विनायक नाचबोणे, (रा.रम्यनगरी कॉलनी, धनु झेंडे

यांचे बिल्डींगमध्ये, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे, मुळ रा. जयनगर, ता. औसा, जि. लातूर) 

प्रविण कैलास

कोरडे, (मुळ रा. बोरी, ता. जुन्नर, जि. पुणे, सध्या रा. राजमाता बिल्डींग, बाबुरावनगर, शिरूर,ता. शिरूर, जि.पुणे) 

व सुनिल उर्फ भाऊ बिभीषण देवकाते (रा. इरले, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांचेसह मिळून २८ ठिकाणी चोऱ्या केल्या असल्याची माहीती सांगितली.

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एकुण ७६ लाख ८८ हजार किंमतीचे १० ट्रॅक्टर, २ पिकअप, १ बोलेरो जिप, १ स्कॉपीओ, ६ मोटार सायकल, ऑक्सीजन सिलेंडर, घरगुती गॅस सिलेंडर, गॅस कटर, ५ गायी, नट बोल्ट खोलावयाचे पाने असा मोठा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.

सदर आरोपींनी पुणे, अहमदनगर, सोलापूर अशा ३ जिल्ह्यांमध्ये २१ ठिकाणी चोऱ्या करून वरील मुद्देमाल चोरी केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.