35 टक्के व्याजदराने पैसे देणाऱ्या ‛पप्पू पडवळचा’ असा झाला ‛गेम’, जाणून घ्या फिल्मी स्टाईलने करण्यात आलेल्या ‛खुणाचा’ संपूर्ण घटनाक्रम



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

पुणे शहरात किरकोळ गुन्हेगारीतून मोठ्या झालेल्यांपैकी एक नाव म्हणजे पप्पू पडवळ. पप्पू पडवळ हा अगोदर कार चालक म्हणून काम करत होता. त्यानंतर त्याने गुन्हेगारी क्षेत्रामध्ये त्याने आपली एक वेगळी छाप पाडत व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय सुरू केला होता. 

नंतर त्याच्यावर गॅंगवारमध्ये खुनी हल्ले ही झाले मात्र त्यातून तो सहीसलामत वाचला आणि त्याने आपले संपूर्ण लक्ष व्याजाच्या धंद्यावर केंद्रित केले. ज्या दिवशी त्याचा घरात घुसून खून झाला त्या दिवसापासून पुण्यात गँगवार भडकते की काय अशी भीती निर्माण झाली. मात्र पोलिसांनी विविध मार्गांनी  तपास केल्यानंतरही त्याचा कोणत्या गुन्हेगारी टोळीने काटा काढला असावा असा एकही पुरावा सापडत नव्हता. अखेर पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त सुनिल कलगुटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक महादेव कुंभार, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतत पाच दिवस तपास करुन हा खुनाचा तपास लावत खरा आरोपी समोर आणलाच.

हा खून एका स्क्रॅप, फॅब्रिकेशनचे दुकान असणाऱ्या सामान्य नागरिकाने केल्याचे समजताच अनेकांना विश्वासच बसत नव्हता, कारण पप्पू हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार होता आणि त्याला मारणे इतके सोपे नव्हते. मात्र व्याजाच्या पैशापायी पप्पू चा गेम झाला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढव्यातील लतिफ शेख नामक व्यक्तीला पप्पूने वेळोवेळी 49 लाख रुपये दिले होते. मात्र हे पैसे फेडण्यासाठी त्याने फ्लॅट व कागदपत्रे गहाण ठेवले होते. लतिफने 49 लाखाच्या बदल्यात आत्तापार्यंत पप्पूला 2 कोटी रुपये दिले होते मात्र तरीही पप्पू पडवळ अजून 80 लाख रुपयांची मागणी करत होता तसेच हे पैसे दिले नाही तर 15 तारखेपर्यंत तुझा मर्डर करतो अशी धमकीही त्याने लतीफला दिली होती. त्यामुळे लतिफने पप्पूलाच संपवायचा प्लॅन आखला.

पप्पू हा झोप न येण्याच्या आजाराने ग्रस्त असल्याने लतिफने त्यास मी एका मौलनाला ओळखतो तो तुमचा आजार ठीक करेल असे सांगत त्याने ठरल्या दिवशी पप्पूच्या घरी जाऊन मौलाना येत असल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळात दोघेजण पप्पू याच्या घरी आले. आणि त्यांनी दोघांनी पप्पूला खाली बसवत त्याच्यासमोर विधीला सुरुवात केली. हे झाल्यानंतर पप्पूला डोळे बंद करायला सांगितले. आणि जसे पप्पूने डोळे बंद केले़ तसे मागे उभे असलेल्याने आपल्या जवळ असलेल्या बॅगेतून कोयता काढून पप्पूवर सपासप वार करायला सुरुवात केली. पप्पू ठार झाल्याची खात्री पटताच हे सर्वजण घर बंद करुन निघून गेले आणि त्यानंतर पप्पू चा खून झाल्याचे समोर आले. पप्पू हा सुमारे 35 टक्के व्याजदराने पैसे देत असल्याचेही पोलिसांच्या तपासातून पुढे आले आहे. त्यामुळे व्याज भरून वैतागलेल्या लतीफने

अखेर पप्पूलाच खलास केले. ज्यावेळी पोलिसांनी तपास करून आरोपीला जेरबंद केले त्यावेळी आरोपी लतीफने मैने हैवान को मारडाला साब असे म्हणत सर्व हकीकत सांगितली.