दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील कानगाव येथे असणाऱ्या शेत जमिनीमध्ये चोरून वाळू उपसा करत असताना शेतकऱ्याने वाळू चोरांना रंगेहात पकडल्यानंतर वाळू माफिया वाळू चोरी करण्यासाठी आणलेले वाहन तेथेच टाकून पसार झाले. याबाबत त्या शेतजमीन मालकाने रीतसर संबंधित पोलीस चौकी आणि महसूल प्रशासनाला याची खबर दिल्यानंतर महसूलचे गावकामगार तलाठ्यांनी येऊन रितसर पंचनामा केला आणि जवळपास 300 ब्रास वाळू चोरी झाल्याचा पंचनामा करून अहवाल दिला आहे.
मात्र हे सर्व होत असताना पोलिसांची भूमिका अतिशय संशयास्पद राहिली आहे. कारण एकीकडे रस्त्यावर थांबून वाळू चोरी केलेल्या गाड्या पकडून पोलीस ठाण्यात जाऊन त्या गाड्यांवर गुन्हा दाखल करणारे पोलीस आणि त्याच पोलीस ठाण्यात एक शेतकरी येऊन माझ्या शेतजमिनीत वाळू माफिया चोरून वाळू काढत आहेत, मी वाळू चोरी केलेले वाहन पकडले आहे त्यावर माझी फिर्याद घ्या असे म्हणत असतानाही त्याची फिर्याद घेतली जात नाही आणि त्यास फक्त इकडून तिकडे फिरवले जाते मात्र फिर्याद घेऊन वाळू माफियांवर गुन्हा दाखल होत नाही याला काय म्हणावे.
पोलिसांना शेतजमीन मालकाने वारंवार याची माहिती देऊनही पोलीस कर्मचारी तेथे गेले नाहीत असा आरोप या शेतजमीन मालकाने करून ज्यावेळी पंचनामा तयार केला गेला त्यावेळी तो शेतजमीन मालक पोलीस ठाण्यात जाऊनही त्याची फिर्याद नोंदवून घेतली गेली नाही. फक्त तुम्ही येथे जा, तेथे जा, साहेब नाहीत, आता महसूल ने पंचनामा केलाय मग कशाला फिर्याद हवी अशी उत्तरे देऊन वाळू माफियांना पाठीशी घालण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.
यात त्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचे नुकसान तर झालेच मात्र शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून सुमारे 300 ब्रास वाळू चोरीला गेली आहे, वाळू चोरी करणारे वाहनही जागेवर पकडण्यात आले आहे. त्यामुळे आता महसूल खाते हि 300 ब्रास चोरी झालेल्या वाळूचे लाखो रुपये नेमके कुणाकडून आणि कसे वसूल करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
वास्तविक पाहता शेतजमिनीमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून वाळू चोरी करणे हि शेतकऱ्याची फिर्याद नोंदवून वाळू चोरांवर गुन्हा दाखल होणे गरजेचे होते,जेणेकरूण दौंड तालुक्याला लागलेले वाळू माफियांचे ग्रहण सुटण्यास आणि वाळू माफियांना चाप बसण्यास मदत होईल. मात्र पोलीस प्रशासनच त्या शेतकऱ्याची फिर्याद घेत नसल्याने वाळू माफियांना आणि वाळू माफियांच्या सापडलेल्या गाडी चालक, मालकाला पोलीस वाचविण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.