पुणे-सोलापूर महामार्गावर 30 लाखाचा सिने स्टाईल दरोडा टाकणारी टोळी दौंड पोलिसांकडून जेरबंद : 19 लाखासह तीन दुचाक्या हस्तगत, मुख्य आरोपी मात्र अजूनही फरार… वाखारीतील शेळके आणि गोरगल या दोन आरोपींचा गुन्ह्यात समावेश



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

पुणे- सोलापूर महामार्गावर दिनांक 29 ऑगस्ट रोजी सायं. 7 वा. दरम्यान येथील वृंदावन हॉटेल समोर (रेल्वे ब्रिज) पुण्याहून सोलापूरच्या दिशेने पोल्ट्री उद्योगासाठीचे खाद्य आणण्यासाठी जाणाऱ्या माल ट्रकवर धूम पिक्चर स्टाईलने दरोडा टाकून दरोडेखोरांनी सुमारे 29 लाख रुपयांची रोकड लुटून नेली होती. दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेची  मदत घेत दरोड्यातील आरोपींना जेरबंद करीत त्यांच्याकडील 19 लाख रुपये व तीन दुचाक्या असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दौंड पोलिसांनी अत्यंत जलद गतीने दरोड्याचा तपास लावून आरोपींना बेड्या ठोकल्या मुळे दौंड पोलीस पथकाचे कौतुक होत आहे.

सदर दरोडा प्रकरणाची पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिलेली माहिती नुसार दिनांक 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेल वृंदावन समोर पुण्याहून सोलापूरकडे पोल्ट्री उद्योगासाठीचे खाद्य आणण्यासाठी जाणाऱ्या माल ट्रकवर दरोडा पडल्याची माहिती दौंड पोलिसांना मिळाली. हि माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दौंड पोलीस ठाणे अंतर्गत कार्यरत केलेल्या ग्राम सुरक्षा यंत्रणेशी तत्काळ संपर्क करीत सदर गुन्ह्यातील आरोपी हे दरोड्यातील 29 लाख रुपये घेऊन दुचाकीवर रावणगाव खडकीच्या दिशेने पळाले आहेत, महामार्गावरील गावांनी सतर्क राहून अशा व्यक्ती ती दिसल्यास त्यांना तत्काळ पकडण्याच्या सूचना केल्या. 

दरम्यान पाटस टोल नाक्याकडून बारामतीकडे जाणाऱ्या  एका दक्ष नागरिकाने सदरचा संदेश ऐकला, मिळालेल्या संदेशा प्रमाणे घटनेतील वर्णनाची दुचाकी त्याला समोरून जाताना दिसली त्याने त्या गाडीचा पाठलाग केला असता गाडीवरील चोरट्यांनी गाडी तेथेच सोडून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. त्या व्यक्तीने लगेच दौंड पोलिसांना सदर घटनेची खबर दिली. दौंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता पोलिसांना त्या ठिकाणी विना नंबरची नवी कोरी दुचाकी(पल्सर) व  गाडीला 8 लाख 28 हजार 200 रुपये असलेली बॅग मिळून आली. आरोपींचा शोध घेतला असता ते मिळाले नाहीत. पोलिसांनी गाडीच्या नंबर व चासी नंबर वरून मालकाचा शोध घेतला असता त्याने ती गाडी त्याच्या मित्राला दिली होती असे सांगितले. आणि तोच मित्र म्हणजे मंगेश चव्हाण हाच दरोड्याचा मास्टर माईंड असल्याचे पोलिसांना समजले. त्याच्याकडून मिळालेल्या या माहितीवरून याच गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीस यवत पोलिसांनी पाटस टोल नाक्यावर अटक केली आणि त्याच्याकडेही दरोड्यातील 2 लाख 10  हजार रुपये मिळून आले. या आरोपीकडून माहिती  घेऊन कटात सहभागी असणाऱ्या तिसर्‍या आरोपीस दौंड पोलिसांनी वाखारी येथून अटक केली आहे. अटकेतील सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

मास्टर माईंड मंगेश चव्हाण याने त्याच्या साथीदारांसह इतर चार आरोपींना सुपारी देऊन आणलेले होते त्यामुळे त्यांची  नावे निष्पन्न नव्हती. दौंड पोलिसांनी नियोजित तपास करून आणखीन 3 आरोपींना अटक केली. सुरुवातीला तो मी नव्हेच असा पवित्रा आरोपींनी घेतला होता परंतु पोलीस खाक्या मिळताच त्यांनी गुन्हा कबूल केला. आरोपींकडून गुन्ह्यातील आणखी 2 दुचाक्या व 8 लाख 36 हजार 722 रुपये रोकड  व गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आली.

सदर गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत जवळपास 19 लाख रुपये जप्त करण्यात आलेले असून गुन्ह्याचा कट रचणारे, आरोपींना फिर्यादी बाबत टीप देणारे, गुन्ह्यातील मास्टर माईंड मंगेश चव्हाण व त्यांचे साथीदार आरोपी अटक करणे बाकी असल्याचे महाडिक यांनी सांगितले.

दरोड्यातील रक्कम पोल्ट्री व्यवसायाची असल्याचे फिर्यादी जरी सांगत असले तरी सदरची रक्कम गुटखा व्यवसायासाठी होती असा पोलिसांना संशय असल्याने दौंड पोलीस त्या दिशेने सुद्धा तपास करीत आहेत.

यामध्ये अटक करण्यात आलेले आरोपी प्रकाश पांडुरंग गोर्गल ( वय 36, रा. वाखारी,दौंड), विक्रम विलास शेळके( वय 23, राहणार वाखारी,दौंड) जाड्या उर्फ पैगंबर तय्यब मुलानी ( वय 20 राहणार अमराई, बारामती), अख्या उर्फ अक्षय वावरे ( वय 20 राहणार माळेगाव, बारामती),  मनोज बाळासाहेब साठे( वय 22 राहणार रुई, बारामती) सदर दरोड्याचा तपास पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उप विभागीय पोलीस अधिकारी टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पोलीस कर्मचारी सुरज गुंजाळ,, महेश पवार, हेमंत भोंगळे,पोलीस नाईक मलगुंडे ,देवकाते, रमेश काळे, भोसले, सचिन बोराडे, पोलीस शिपाई जब्बार सय्यद, किशोर वाघ, नारायण वलेकर यांच्या पथकाने कामगिरी पार पाडली आहे.