राहुल अवचर
देऊळगाव राजे : आजपर्यंत पाळीव प्राणी, कुत्रे यावर हल्ला करणारा बिबट्या आता माणसांवर हल्ला करू लागला आहे. देऊळगाव पासून अवघ्या पाच किलोमीटरवर असणाऱ्या अजनुज (ता.श्रीगोंदा) गावात काल रात्री एका तीन वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात ती मुलगी जागीच मृत्युमुखी पडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांची यातील तीन वर्षाची लक्ष्मी अरुण गायकवाड (पाटोदा, चाळीसगाव) या मुलीवर बिबट्याने झडप घालून उचलून नेले हे तिच्या आईच्या लक्षात आल्यावर आईने टाहो फोडला. मग गावकऱ्यांनी उसाच्या आणि गव्हाच्या शेतात घुसून बिबट्याचा पाठलाग केला. जवळच असणाऱ्या काटवणाच्या शेतात लक्ष्मी मिळाली परंतु तिचा मृत्यू झाला होता.
याबाबत अधिक माहिती देताना ग्रामस्थांनी सांगितले की, अंबालिका कारखान्याच्या मजुराच्या टोळीतील ही चिमुकली कोपीच्या बाहेर खेळत होती. तिची आई कोपित स्वयंपाक करत असताना बिबट्याने अचानक लक्ष्मीवर हल्ला केला आणि उचलून नेले. आईने आरडा ओरडा केल्यावर जवळच असणाऱ्या हॉटेलमधील लोक बाहेर पळाले बॅटरी लावल्यावर मुलीला बिबट्या घेऊन जात असल्याचे लक्षात आले. लोकांना ऑर्डर आरडा ओरडा केल्यावर पूर्ण गावच जमा झाले बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण काहीच हाती लागले नाही शेवटी काटवणाच्या शेतात पाहिले असता मुलगी जखमी अवस्थेत पडलेली दिसली तिच्या मानेवर व गळ्यावर दातांच्या खुणा होत्या ती जखमी असेल असे लोकांना वाटले व गावातील डॉ. अजित काकडे यांच्या रुग्णालयात नेण्यात आली पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
आज पर्यंत देऊळगाव राजे आणि परिसरातील वारंवार नजरेस पडणारा बिबट्या आणि पाळीव प्राण्यांवर हल्ला करणारा आता मानवावर हल्ला करू लागल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. शेतात काम करणारे शेतमजूर आपला जीव मुठीत धरून शेतातील कामे करत आहेत. वन विभागाला वारंवार सांगून देखील कुठलीही ठोस भूमिका त्यांच्याकडून घेतली जात नाही हे दुर्दैव तरी वन विभागाकडून परिसरात पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी समस्त नागरिकांमधून होत आहे.