पोलिसांवर जीवघेणा हल्ला करून 3 वर्षांपासून फरार असणारे आरोपी ‛LCB’ शाखेकडून जेरबंद



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

दि. 1/10/2017 रोजी खेड पोलीस स्टेशनचे पोलीस पथक दारूच्या हातभट्टीवर कारवाई करण्यासाठी गेले होते. तेथे रुपये 3,00,000 किंमतीचे महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू तस्करीसाठी आणला असल्याची माहिती मिळाल्याने त्यावरही कारवाई करण्यासाठी हे पोलीस गेले असता तेथील स्थानिकांनी पोलिसांवर खुनी हल्ला केला होता. याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता. या खुनी हल्ल्यात एकुण सात पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले होते. सदर गुन्ह्यात पाहिजे असलेले आरोपी तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. 

आरोपी 1) रघुनाथ दामु वाघ (वय – ४५ वर्षे,) 2) संतोष रघुनाथ वाघ, 3) सखाराम दामु वाघ सर्व रा. विठ्ठलवाडी, शिरगाव, ता. खेड, जि. पुणे हे गावी आल्याचे एल. सी. बी. (LCB) पुणे ग्रामीणच्या टीमला बातमीदाराकडून समजल्याने तात्काळ आज दि.16/07/2020 रोजी पहाटे त्यांच्या राहते घरी जाऊन आरोपींना ताब्यात घेताना  स्थानिकांचा होणारा विरोध गृहीत धरून व्यावसायिक कौशल्य वापरून तिन्ही आरोपी एल. सी. बी. टीम ने ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी खेड पोलीस स्टेशनच्या हवाली केले आहेत. 

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि रवींद्र मांजरे, पो हवा. शंकर जम, पो. हवा. सुनील जावळे, पो. हवा. शरद बांबळे, पो. ना. दीपक साबळे, चा. पो. शि. अक्षय जावळे यांच्या पथकाने केली आहे.