यवत येथील शासकीय विश्राम गृहाच्या परिसरात दरोडा टाकून फरार असलेला वाळूमाफिया 3 वर्षांनी जेरबंद : LCB पथकाची कामगिरी



पुणे : सहकारनामा

यवत ता.दौंड येथील महसूल विभागाचे रखवालीत असणारे दोन वाळूचे ट्रक दरोडा टाकून पळवून नेल्याच्या प्रकरणातील तीन वर्षापासून फरारी असलेला वाळूमाफियास अकलूज जि.सोलापूर येथून जेरबंद केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

दौंड तालुक्यातील यवत गावचे हद्दीत शासकीय विश्रामगृहाचे परीसरात दि.१३ मार्च २०१७ रोजी १७:०० वा. सुमारास महसूल विभागाचे कर्मचारी शहाजी मारूती भंडलकर (रा.खामगाव ता.दौंड जि.पुणे) व काळुराम जगन्नाथ शेवाळे (रा.यवत ता.दौंड जि.पुणे) हे दोघेजण तहसीलदार यांनी चोरटी वाळु वाहतुक करताना पकडलेल्या २१ ट्रकवर शासकीय विश्राम गृहात देखरेखीच्या कामावर होते.

त्यावेळी आरोपी १) राजकुमार संपत पवार वय (२७ वर्षे रा.गारअकोले ता.माढा जि.सोलापुर) २) अमोल दत्तात्रय माकर (वय २७ वर्षे रा.गोकळी ता.इंदापुर जि.पुणे) ३) कृष्णा श्रीनिवास पाटील (वय २४ वर्षे रा.पानीव ता.माळशिरस जि.सोलापुर) ४) रमेश दगडू शिंदे (रा.पानीव ता.माळशिरस जि.सोलापुर) व इतर दोघे यांनी संगनमत करून ट्रक चोरून नेण्याचे उद्देशाने शासकीय विश्रामगृहामध्ये आले होते. 

यावेळी सदर आरोपींनी शहाजी भंडलकर व काळुराम शेवाळे यांना हाताने लाथाबुक्कांनी मारहाण करून काळुराम शेवाळे यांचे तोंडात रूमाल कोंबुन तोंडाला चिकटपट्टी लावुन महसुल विभागाने जप्त केलेले १०,००,०००/- रू किमतीचे प्रत्येकी तीन ब्रास वाळुसह भरलेले दोन ट्रक नं.एम.एच.१२ एफ.झेड ४९५५ व  ट्रक नं. एम.एच.१३ ए.एक्स ४५३८ हे वाळूसह शासकीय कामात अडथळा आणुन दरोडा टाकुन पळवून नेले होते. त्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून वाळू माफियांविरुद्ध दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यामध्ये यापूर्वी तीन आरोपींना अटक करण्यात आलेली होती.

पुणे जिल्हयाचे पोलीस अधीक्षक  डॉ.अभिनव देशमुख ग्रामीण यांचे आदेशाने रेकॉर्डवरील वॉन्टेड आरोपी पकडणेकामी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहिम राबवित असताना, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले सहा.पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, अक्षय नवले यांचे पथकास  दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजी सदर दरोडयाच्या गुन्हयातील तीन वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी रमेश दगडू शिंदे (वय ३४ वर्षे रा.पानीव ता.माळशिरस जि.सोलापूर) हा बावडा अकलूज रोड येथे येणार असल्याची बातमी मिळताच या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी हा अकलूज जि.सोलापूर येथून तो पळून जात असताना त्यास पाठलाग करून ताब्यात घेतलेले आहे.

सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले असून अधिक तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे करीत आहेत.