सरकारी दवाखान्यात नोकरीला लावतो म्हणून तरुणाची 3 लाखांची फसवणूक, नोकरीचे आमिष दाखवून फसवणुक करणाऱ्यांचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता

पुणे : महाराष्ट्र शासानाच्या दवाखान्यात
आरोग्य सेवक म्हणून नोकरीस लावतो
असे सांगून एका तरुणाची 3 लाख रुपये घेऊन फसवणूक करण्यात आल्याची घटना तळेगाव ढमढेरे येथे उघडकीस आली आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नोकरीच्या नावाखाली पैसे उकळण्याचे हे एक मोठे रॅकेट असून यात अजूनही काही युवकांची अश्याच पद्धतीने फसवणूक झाली असल्याची चर्चा या परिसरात रंगत आहे. त्यामुळे या फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत राहुल अरविंद खोडके (रा. सध्या तळेगाव ढमढेरे, ता.शिरूर, पुणे) यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून श्रीकृष्ण बिभीषण आवाड आणि डॉ.कल्याण मधुकर घोडके (दोघे रा.तळेगाव ढमढेरे ता.शिरूर, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना आरोपींनी महाराष्ट्र शासनाच्या नावाची बनावट व खोटी कागदपत्रे व आदेश दाखवून महाराष्ट्र शासानाच्या दवाखान्यात
आरोग्य सेवक म्हणून नोकरीस लावतो
असे सांगून त्यांच्याकडून विश्वासाने तीन
लाख रूपये घेतले होते. ही घटना दि. 27 डिसेंबर 2021 ते 27 जुलै 2023 दरम्यान घडली आहे. मात्र आपल्याला दाखविलेली कागदपत्रे खोटी असून आपली फसवणूक करून आर्थिक नुकसान केले जात असल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात अश्याच प्रकारे आणखीही काही जणांची फसवणूक करण्यात आली असावी असा पोलिसांना संशय असून त्या दृष्टीनेही पोलीस माहिती घेत आहेत. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आतकरे हे करीत आहेत.