वरवंड लसीकेंद्राबाहेर तुंबळ हाणामारी! उपसरपंचासह एकाला बेकायदा जमावाकडून मारहाण, सोन्याची 3 तोळ्यांची चैनही लंपास, 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल



दौंड : दौंड तालुक्यातील वरवंड येथे लसीकरण करताना लाईनमध्ये घुसू न दिल्याच्या रागातून वरवंडच्या उपसरपंचाला जबरी मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून याबाबत यवत पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यवत पोलिसांनी वरवंड चे उपसरपंच प्रदीप किसन दिवेकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी विजय भास्कर दिवेकर, राजेंद्र भास्कर दिवेकर, दत्तात्रय दशरथ दिवेकर, गोपीनाथ मच्छिंद्र दिवेकर, ओंकार विजय दिवेकर, बापू किसन बारवकर, वैभव राजेंद्र दिवेकर, सुनीता राजेंद्र दिवेकर (सर्व रा. वरवंड, ता.दौंड जि.पुणे) या आठ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि.3 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिप प्राथमिक शाळेत लसीकरण सुरू असताना  फिर्यादी प्रदीप किसन दिवेकर (उपसरपंच, वरवंड) यांनी वैभव दिवेकर यास लसीकरणाचे लाईनमध्ये घुसु न दिल्याने आरोपी याने फिर्यादी उपसरपंच यांना शिवीगाळी, दमदाटी करून त्यांचे गचंडे धरून त्यांच्या गळयातील 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची 3 तोळे वजनाची चैन जबरीने काढुन घेवुन तो त्याचे हॉटेलकडे पळत गेला. त्यावेळी प्रदीप दिवेकर हे आरोपीच्या मागे हॉटेल समोर गेले असता तेथे आरोपी व त्याच्या अन्य साथीदारांनी  बेकायदा गर्दीचा जमाव जमवुन हॉटेल मधील महिला आरोपीने तिच्या हातातील झा-याने फिर्यादीचे हातावर, पाठीवर मारहाण केली. यावेळी अन्य आरोपींनी फिर्यादी यांना हातोडयाने पाठीत तर अन्य आरोपींनी लोखंडी गजाने फिर्यादीचे डावे बाजुचे बरगडीवर मारहाण केली. 

यावेळी तेथे भांडणे सोडविण्यासाठी संतोष दत्तात्रय दिवेकर हे मध्ये आले असता त्यांनाही आरोपींनी लाथाबुक्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई गंपले हे करीत आहेत.