दौंड : दौंड हद्दीतील भीमा नदी पात्रात वाळूचा अवैधपणे उपसा करून त्यांची विक्री करणाऱ्या तीन वाळू माफियांना दौंड पोलिसांनी बेड्या ठोकून जेलची हवा दाखविली. दिलीप पोपट ढगे (रा. पेडगाव. ता. श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर), रोहिदास नारायण बाराते, महादेव सुरेश मोरे (दोघे रा. वडगाव, दौंड) असे अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, पहाटेच्या वेळेस पोलिसांची नजर चुकवुन भीमा नदी पात्रातून अवैधपणे वाळू उपसा करून त्याची वाहतूक करणारे ट्रक दौंड पोलिसांच्या हद्दीतून जाणार आहेत अशी खबर खुद्द पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना मिळाली होती, त्यानुसार घुगे यांनी तात्काळ पोलिसांचे पथक संबंधित ठिकाणी पाठविले असता खोरवडी रेल्वे गेट व आलेगाव फाटा येथे चोरीच्या वाळूने भरलेले चार ट्रक पथकाच्या हाती लागले. ट्रक जप्त करण्यात आले असून तीन आरोपींना दोन विविध गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे.
वाळू माफियांचा 33 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पो. हवा. पांडुरंग थोरात, सुभाष राऊत, पो. ना. किरण राऊत, अमोल गवळी, रंजीत निकम, निखिल जाधव व अमोल देवकाते या पथकाने कारवाई केली.