दौंडकरांच्या एकीच्या बळाला मिळाले यश ! शहरातील 3रे कोविड सेंटरही बंद, दौंडची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल



|सहकारनामा|

दौंड : (अख्तर काझी)

जिंदगी हर कदम एक नयी जंग है, जीत जायेंगे हम तुम अगर संग है…. हे दौंड करांनी करून दाखविले. दौंड करांनी कोरोना मुक्तीच्या दिशेने आणखीन एक पाऊल टाकले असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. 

कोरोना रुग्णांची संख्या खूपच कमी झाल्याने शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत सुरू केलेले गुजराती कोविड सेंटर हे तिसरे सेंटरही आज  बंद करण्यात  आले. शहरातील  कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती तेव्हा दौंड करांनी आपल्या एकीचे बळ दाखवीत व प्रशासनाला मदत करण्याच्या उद्देशाने शहरामध्ये तीन कोविड सेंटर सुरू केली होती, परंतु रुग्णांची संख्या कमी झाल्याने याआधी शहरातील दोन सेंटर बंद करण्यात आली आणि आज तिसरे कोविड सेंटर सुद्धा बंद करण्यात आले. येथील  पोकार, शहा (सराफ),  लुंड या परिवाराच्या मोठ्या  मदतीमुळे गुजराती भवन कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. 70 दिवसांच्या कालावधी मध्ये या सेंटर मध्ये उपचार घेणाऱ्या तब्बल 368 रुग्णांनी कोरोना वर मात केली. 

याच 70 दिवसांच्या कालावधीत कोविड सेंटरला कोणत्याच गोष्टींची कमतरता भासू नये म्हणून शहरातील ज्या दानशूरांनी, संघटनांनी, डॉक्टर्स,सामाजिक कार्यकर्त्यांनी, कलाकारांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे मोलाची मदत केली त्या सर्वां साठी गुजराती कोविड सेंटर आयोजकांच्या वतीने सत्कार व आभार प्रदर्शनाचा छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सर्व सत्कार मूर्तींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे, तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ व डॉक्टर राजेश दाते यांचे यावेळी विशेष आभार मानीत त्यांचा सन्मान करण्यात आला. 

उपस्थित मान्यवरांनी गुजराती कोविड सेंटर सुरू करण्यासाठी एकत्र आलेल्या मित्रांचे,त्यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक करीत दौंड करांच्या वतीने त्यांचे आभार मानले. कार्यक्रमास ज्येष्ठ नगरसेवक बादशहा शेख,  इंद्रजीत जगदाळे, गोविंद अग्रवाल, स्वप्निल शहा, डॉ. शलाका लोणकर, डॉ. समीर कुलकर्णी, डॉ. दीपक जाधव,डॉ. प्रेम कुमार भट्टड, डॉ. फिलोमन पवार, डॉ. स्वप्निल पाटील आधी मान्यवर उपस्थित होते.