यवतचे कोविड सेंटर सुरू होऊन 3 आठवडे तर स्वामी चिंचोलीच्या कोविड सेंटरला 1 आठवडा पूर्ण



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड शहरामध्ये कोविड सेंटर सुरू झाल्यानंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. अनेक रुग्णांनी आपले अनुभव शेअर करताना येथील डॉ.डांगे आणि त्यांच्या वैद्यकीय टीमचे कौतुक केले होते. त्याच धर्तीवर आता दौंड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या यवत येथे कोविड सेंटर सुरू होऊन तीन आठवडे पूर्ण झाले आहेत तर स्वामी चिंचोली येथे कोविड सेंटर सुरू होऊन 1 आठवडा पूर्ण झाला आहे.

या सेंटरमध्ये भर्ती होणाऱ्या रुग्णांची योग्य पद्धतीने काळजी घेण्यात येत असल्याचे रुग्णांनी दिलेल्या माहितीवरून पुढे येत आहे. यवत येथील सेंटरमध्ये डॉ.इरवाडकर आणि त्यांची संपूर्ण टीम कोरोना बाधित रुग्णांची योग्य ती काळजी घेत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि नागरिकांना कोरोना चाचण्या आणि उपचारांसाठी होणारी जीवघेणी कसरत लक्षात घेता हे कोविड सेंटर्स सुरू करण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी दिली. यवत आणि स्वामी चिंचोली येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांची कोरोनाची तपासणी व उपचार सुरू असून केले या सेंटर्समध्ये 200 च्या जवळपास खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.