| सहकारनामा |
मुंबई :
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्य सरकार सर्व आरोग्य यंत्रणांना आर्थिक पाठबळ देत आहे. या प्रयत्नांना हातभार म्हणून राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीनं १ कोटी रू. तर, सर्व विधिमंडळ व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण २ कोटी रू. धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रत्येक आपत्तीत महाराष्ट्रातील जनतेच्या सोबत राहिला आहे आणि त्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्यास कटिबद्ध आहे. म्हणूनच कोरोना विरूद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट तर्फे एक कोटी तर पक्षाच्या राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आले असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार आणि खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रकमेचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी मुंबई युवती काँग्रेसच्या अध्यक्ष अदिती नलावडे उपस्थित होत्या. राज्यातील प्रशासन व जनता कोरोनाच्या या अभूतपूर्व संकटासोबत जोमाने लढा देत आहे. पण एकूणच जगभराचा आर्थिक विकास मंदावला असल्याने राज्याच्या तिजोरीवर ताण पडत आहे.
राज्यातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतला असल्याने राज्याच्या तिजोरीवरचा भार अधिक वाढणार आहे. त्यामुळे या संकटकाळात आपली सामाजिक बांधिलकी जपत पक्ष मदतीसाठी पुढे सरसावला असल्याचे शेवटी आयोजकांनी सांगितले.