दौंड : दौंड तालुक्यातील पाटस येथे दोन युवकांच्या निर्घृण खून प्रकरणी चौफुला येथील परशुराम उर्फ आबा गडधे याचा सहभाग असल्याचे आता समोर आले आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी परशुराम गडधे यास अटक केली असून त्यास न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
यवत चे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 4 जुलै रोजी पाटस येथे शिवम शितकल आणि गणेश रमेश माकर (रा. पाटस, अंबिकानगर, दौंड) या दोन युवकांची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. हि हत्या किरकोळ वादातून झाली होती मात्र हत्येचे स्वरूप पाहता हि हत्या एखाद्या टोळी युद्धातील असल्यासारखे दिसत होते. पोलिसांनी या दोन युवकांच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक केली होती तर नुकतीच बारामती तालुक्यातून जाधव नामक तरुणाला अटक करण्यात आली होती. जाधवला अटक झाल्यानंतर या खूना मागील पडद्यामागून मदत करणारे काही हात समोर येऊ लागले आणि यवत पोलिसांनी लागलीच याबाबत कडक ऍक्शन घेत परशुराम उर्फ आबा गडधे याला अटक केली. आबा गडधे हा खुनातील आरोपींच्या संपर्कात होता आणि तो त्यांना मदत करत होता असा ठपका पोलिसांनी त्याच्यावर ठेवत या खुनात त्याचा सहभाग असल्याचे सांगितले आहे.
दोन युवकांची निर्घृणपणे झालेली हत्या आणि त्यातून समोर आलेले टोळीचे कनेक्शन पाहता खुद्द पुणे ग्रामिण चे एसपी डॉ.अभिनव देशमुख यांनी जातीने लक्ष घालत आरोपींना जेरबंद करण्याचे आदेश दिले होते.