पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सेवादल सेलचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गहिवरून आले. दीपक मानकर हे देशाचे जेष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत जवळचे विश्वासू कार्यकर्ते होते.
दीपक रामचंद्र मानकर यांचे गुरुवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह लोणावळा परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
दीपक मानकर यांच्या निधनाची बातमी समजताच अजित पवार यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष श्री. दिपक रामचंद्र मानकर यांच्या निधनाची बातमी ऐकून मला धक्का बसला. दिपक मानकर यांच्या निधनानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं चांगला कार्यकर्ता, आम्ही निकटचा सहकारी गमावला आहे. पक्षाचं अधिवेशन, संमेलन, कार्यकर्ता परिषदेला आपल्या लोणावळा गावची चिक्की घेऊन आवर्जून उपस्थित राहणारे, चिक्की भरवून सर्वांचं तोंड गोड करणारे दिपक मानकर यापूढे भेटणार नाहीत, याची खंत मला कायम राहील.
दिपकजी गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील रुग्णालयात उपचार घेत होते. ते बरे होऊन आपल्यात परत येतील, असा विश्वास होता. परंतु आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि मला धक्का बसला. मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. आमच्या दिवंगत मित्राला, सहकाऱ्याला भावपूर्ण श्रद्धांजली! अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला आहे.