पुणे :
दौंड तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून सामाजिक न्याय खात्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या निधीतून पाटस येथील नागेश्वर नगर, योगेंद्र नगर, शिंगाडे वस्ती, पाथरशेत येथे तर स्वामी चिंचोली व यवत येथील इंदिरानगर येथे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. याबरोबरच तालुक्यातील रावणगाव येथील दलित वस्तींमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय, रस्ता, बंदिस्त गटारे आदी सुविधा करण्यात येणार आहेत.
याशिवाय नंदादेवी येथे स्मशानभूमीची सुधारणा, पडवी, मळद, मलठण आणि दौंड शहरातील भीमनगर व साठे नगर येथे बहुद्देशीय सभागृह तथा समाजमंदिर उभारण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी निधी मंजूर करुन दिल्याबद्दल सामाजिक न्याय खात्याचे मंत्री मा. धनंजय मुंडे यांचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले आहे.