शिरूर :
जमिनीच्या जुन्या व्यवहाराच्या वादातून एकावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना शिरूर येथे घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि.११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास शिरूर येथील नरेंद्र सायकल मार्ट याठिकाणी आरोपी संभाजी बाजीराव कर्डीले (रा.थापेमळा, शिरूर ता.शिरूर जि. पुणे) याने जुन्या जमीनीचे व्यवहाराच्या कारणावरून फिर्यादी अविनाश प्रविणचंद रावल (वय ४७ रा. संगमवाडी, शिवाजीनगर) यांचा भाऊ सचिन उर्फ मुन्ना प्रविणचंद्र रावल (वय ४५ हा त्याच्या स्कुटी मो. सायकलवर बसलेला असताना आरोपी संभाजी कर्डीले याने त्याच्या पाठीत दगड मारून त्याच्याकडे असणाऱ्या कोयत्या सारख्या तीक्ष्ण हत्याराने तुला संपवतोच” असे म्हणुन सचिन रावल याच्यावर सपासप वार केले.
कर्डीले हा सचिन रावल याच्या डोक्यात हत्याराने वार करत असताना सचिन रावल याने हातावर वार झेलल्याने उजव्या हातास मोठी जखम झाली मात्र त्याचा जीव या जीवघेण्या हल्ल्यात बचावला. आरोपीने सचिन रावल यांच्या कंबरेवर, मानेवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला चढवला होता मात्र केवळ नशीब बलवत्तर म्हणून हे वार चुकविण्यात सचिन रावल याला यश आले. मात्र हे वार चुकविताना त्याला हातावर, कंबरेला आणि दंडावर जखमा झाल्या आहेत. याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.