वाळू माफियांना दौंड पोलिसांचा पुन्हा दणका! वाळू चोरी प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल तर 27 लाख 54 हजाराचा मुद्देमाल जप्त



दौंड : (अख्तर काझी) 

दौंड हद्दीतील भीमा नदी पात्रातून वाळू चोरी करणाऱ्या वाळू माफिया विरोधात धडक कारवाई करीत दौंड पोलिसांनी 4 जणांवर गुन्हा दाखल करून 27 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

शहर व तालुक्यातून वाळू माफियांना पूर्णपणे हद्दपार करण्याचा विडाच पोलीस प्रशासनाने उचलला असल्याचे चित्र सध्या दिसते आहे. सदर कारवाई बाबत दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.18 मार्च रोजी रात्री 2.30 च्या दरम्यान दौंड तालुक्यातील वाटलुज गावातील भीमा नदीपात्रातून काही इसम चोरून वाळू उपसा करत असल्याची खबर नव्याने पदभार स्वीकारलेले परिविक्षाधीन पोलीस उप.अधीक्षक मयूर भुजबळ यांना मिळताच  त्यांनी तात्काळ दौंड पोलिसांचे पथक कारवाईसाठी पाठविले. 

पोलिसांचे पथक सदर ठिकाणी पोहोचले तेव्हा वाळूमाफियांची दोन वाहने राजेगावच्या दिशेने जात होती, त्यावेळी पोलिसांनी वाहनांचा पाठलाग केला असता वाहन चालकांनी आपली वाहने सोडून अंधाराचा फायदा घेत पलायन केले. पोलिसांनी वाळू चोरी करणाऱ्यांची वाहने

ताब्यात घेत मालक व चालकाची माहिती काढली व भा. द. वि.379, पर्यावरण संरक्षण अधिनियम 9,15 तसेच सार्वजनिक संपत्ती हानी प्रतिबंधक कलमान्वये गाडी मालक गणेश सुनील सावंत, शेळके व चालक काळे, एक अज्ञात चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उपअधीक्षक मयूर भुजबळ, पो. निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक वाघमारे, पो. ना. सस्ते, होमगार्ड चोरमले या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.