दौंड : सहकारनामा
दौंड तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच सदस्यांचा सत्कार समारंभ भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते आज दि.15 फेब्रुवारी रोजी पार पडला. या मध्ये भाजपचे २७ सरपंच ३३ उपसरपंच तर ३२५ ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२७ ग्रामपंचायतींचे सरपंच या कार्यक्रमाला उपस्थित असल्याने राष्ट्रवादीने केलेला 32 जागांचा दावा फोल ठरला असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
या सत्कार समारंभ कार्यक्रमात आमदार राहुल कुल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात दौंड तालुक्याला भरघोस असा निधी मिळाला असल्याचे सांगितले. दौंड तालुक्यातून गेलेला 100 किमीचा 300 कोटींचा अष्टविनायक महामार्ग रस्ता हे त्याचे उत्तम उदाहरण असून या रस्त्यामुळे तालुक्यातील दळण वळणाची बराचशी अडचण दूर होणार आल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी राज्यात भाजपचे सरकार लवकरच येऊ शकते असे म्हणत केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत त्याचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन केले आणि 1500 कोटींपर्यंत आपण विकास कामांची झेप घेतली आहे आणि हे विरोधकही नाकारू शकनार नाही असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले आहे. तालुक्यात विविध बाबींवर बोलताना दौंड तालुक्यात आरोग्याच्या दृष्टीने अनेक कामे झाली आहेत, विविध गावांतील रहिवासी अतिक्रमण नियमित करण्याचा आपला पूर्ण प्रयत्न आहे व त्याबाबत अनेक गावांत सुरुवातही झाली असल्याचे सांगून निवडून येणे एक वेळेस सोपे आहे पण जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे अवघड असते त्यामुळे पूर्ण ताकदीने आपण जनतेची कामे केली तर विजय निश्चित होतो असा विश्वास शेवटी त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप तालुकाध्यक्ष माऊली अण्णा ताकवणे यांनी केले तर वासुदेव नाना काळे, नामदेवनाना बारवकर यांची भाषणे झाली.
या कार्यक्रमाला माजी आमदार श्रीमती रंजनाताई कुल, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कांचनताई कुल, भीमा पाटसचे मा.व्हाईस चेरमन आनंददादा थोरात, व्हाईस चेरमन नामदेव नाना बारवकर, धनाजीभाऊ शेळके यांसह विविध पदाधिकारी, मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.