दौंड – पुणे रेल्वे प्रवाश्यांसाठी पुणे पोलीस संकेतस्थळाद्वारे क्यु आर कोड प्रणाली पुन्हा सुरु करावी : आ.राहुल कुल यांचे उप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पुणे : 

दौंड-पुणे रेल्वेने शासकीय, निमशासकीय आणि आवश्यक सेवांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना पुणे पोलीस या संकेतस्थळाद्वारे साक्षांकित करून देण्यात येणाऱ्या क्यु आर कोड प्रणाली बंद करण्यात आल्याने प्रवाश्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, प्रवाशांची नेमकी ही अडचण लक्षात घेऊन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी उप जिल्हाधिकारी यांना पुणे पोलीस संकेत स्थळावर क्यू आर कोड सुविधा पुन्हा सुरू करण्याबाबत निवेदन दिले आहे.

आ.कुल यांनी माहिती देताना कोरोनामुळे रेल्वे प्रवासावर लागू असलेल्या निर्बंधांमुळे गेले काही महिने अत्यावश्यक सेवा, शासकीय, निमशासकीय सेवा तसेच आवश्यक सेवांसाठी दौंड – पुणे हा दैनंदिन रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुणे पोलीस या संकेतस्थळाद्वारे साक्षांकित करून देण्यात येणाऱ्या क्यु आर कोड आधारे रेल्वे द्वारे अनारक्षित तिकीट किंवा मासिक पास देण्यात येत होते. परंतु मागील आठवड्यापासून पासुन पुणे पोलीस या संकेतस्थळाद्वारे क्यु आर कोड़ साठी आवेदन करण्याची सुविधा अचानक बंद करण्यात आली असल्याचे सांगितले.

क्यु आर कोड़ अभावी रेल्वेने दौंड – पुणे हा दैनंदिन रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मासिक पास / अनारक्षित तिकीट देणे बंद केले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत असून चाकरमान्यांची मोठी गैरसोई होत आहे तेव्हा पुणे पोलीस या संकेतस्थळाद्वारे क्यु आर कोड प्रणाली पुन्हा सुरु करण्यात यावी किंवा इतर पर्यायी व्यवस्था सुरु करण्यात यावी याबाबत आमदार राहुल कुल यांनी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांची आज भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले.