दौंड : दौंड तालुक्यातील खडकी येथे असणारे एटीएम मशीन आणि त्यातील रोख रक्कम असा सुमारे 8 लाख 19 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अनिल भाऊसो शिंदे ( व्यवसाय नोकरी, रा.पारवडी, बारामती) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खडकी येथे गाळा मालक स्वप्नील मच्छिद्र काळभोर यांचे गाळा नं.1 मध्ये फिर्यादी हे ज्या कंपनीत काम करतात त्या हिताची कंपनीचे PERTO MPZ 07990 आयडी असलेले निळ्या रंगाचे एटीएम मशीन बसविण्यात आले होते. दि.10 ऑक्टोबर रोजी रात्री 1:30 ते सकाळी 07:00 च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या एटीएम चा काचेचा दरवाजा उघडुन आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी ते मशीन कशाच्यातरी सहाय्याने ओढुन व तोडुन पुर्णपणे उखडून ते मशीन अंधाराचा फायदा घेवुन चोरून नेले.
चोरीस गेलेल्या एटीएम मशीनमध्ये सुमारे 1 लाख 50 हजारांची रोख रक्कम होती. या मशीन ची किंमत 6 लाख 69 हजार 100 रुपये इतकी असून एकूण 8 लाख 19 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरीस गेलेला आहे.
अधिक तपास पोसई लोंढे हे करीत आहेत.