Breaking News | दौंड तालुक्यात 25 हजार किलो गोमांस पकडले | 59 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त

अख्तर काझी

दौंड : हैदराबादहून सोलापूर मार्गे मुंबईला जात असलेला, तब्बल 25 हजार किलो गोमांस वाहतूक करणारा कंटेनर दौंड तालुक्यातील खडकी हद्दीत पकडला आहे.  याच कंटेनरमध्ये असलेले 4 हजार किलो म्हशीचे मांस सुद्धा दौंड पोलिसांनी यावेळी जप्त केले आहे. कंटेनरसह या मांसाची किंमत 59 लाख 20 हजार रुपये असल्याची माहिती दौंडचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.45 च्या सुमारास गोरक्षक अक्षय राजेंद्र कांचन (रा. महादेव नगर, उरुळी कांचन ,ता. हवेली) यांना माहिती मिळाली की गोमांसाची मोठ्या प्रमाणात वाहतूक करणारा कंटेनर हैदराबादहुन सोलापूर मार्गे मुंबईला जात आहे. त्यानुसार दौंड तालुक्यातील खडकी हद्दीतील आकांक्षा हॉटेल परिसरात सदरचा कंटेनर (MH 46, AR 0516) दौंड पोलिसांनी पकडला  यावेळी  त्यामध्ये 25 हजार किलो गोमांस व 4 हजार किलो म्हशीचे मांस मिळून आले. याप्रकरणी दौंड पोलिसांनी कंटेनर चालक चंद्रकांत दत्तू साळुंखे (रा. खांदा कॉलनी,ता. पनवेल, जिल्हा रायगड) विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीणचे पो. अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पो. अधीक्षक रमेश चोपडे, दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पो. निरीक्षक संतोष डोके, सहा. पो. निरीक्षक तुकाराम राठोड, सहा. फौजदार कुंभार, पो. हवा. बंडगर, पो. हवा. पांढरे, पो. हवा. राऊत, पो.कॉ. कोठावळे यांच्या पथकाने केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पो. निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.