दौंड शहरात पुन्हा 23 जणांना कोरोनाची लागण, रॅपिड अँटीजेन ने अवघ्या अर्ध्यातासात अहवाल ! नागरिकांची साथ मिळत नसल्याने डॉक्टरही हतबल



दौंड : सहकारनामाऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड ग्रामीण पाठोपाठ दौंड शहर आणि परिसराचाही अहवाल प्राप्त झाला असून या अहवालामध्ये दौंड उपजिल्हा रुग्णालय तर्फे  दिनांक 26/8/2020 रोजी एकुण 116 जणांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली आहे. या सर्व रुग्णांचे रिपोर्ट अवघ्या अर्ध्या तासात प्राप्त झाले असून  116 जणांपैकी 23 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर 93 व्यक्तीचे अहवाल हे निगेटिव्ह आले  असल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 10 महिला, 13 पुरुषांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आलेल्या  रुग्णांची गाव निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे – कुरकुंभ = 6, गणेगाव दुमाला =1, गांधी चौक = 1, धुमाळ वस्ती = 1, जाधव वाडी गिरीम = 3, शालिमार चौक = 1, देऊळगाव राजे = 2, सांगवी दुमाला = 1,  मीरा सोसायटी. = 1, हॉटेल शांताई मागे = 3, आलेगाव = 1, कुसेगाव = 1, दौंड = 1.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये अडीच वर्षाच्या बाळापासून ते  62 वर्ष वयोमान असलेल्या वृद्धांचा समावेश आहे. डॉक्टर आपल्या परीने शर्थीचे प्रयत्न करून रुग्ण कमी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र जनता त्यांना हवे तसे सहकार्य करत नसल्याने त्यांचाही नाईलाज होत आहे. मास्क न घालणे, गर्दीच्या ठिकाणी घोळक्याने उभे राहणे, शिंकताना, खासताना तोंडावर हात न ठेवणे अशा चुका या कोरोनाला आमंत्रण देणाऱ्या ठरत आहेत. नागरिकांनी जर लवकर यावर उपाय योजना सुरू केली नाही तर दौंड तालुका हा महाभयानक अशा परिस्थितीला सामोरे जाऊ लागू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.