राष्ट्रवादी काँग्रेसचा 22 वा वर्धापनदिन मुंबईत दिमाखात साजरा, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांबद्दल केले ‛हे’ विधान



|सहकारनामा|

मुंबई : आज दि. 10 जूूून 2021 रोजी  मुंबई च्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी उपस्थित पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या विशेष दिनाच्या शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्ता  पक्षाचा कणा आहे. आदरणीय शरद  पवार साहेबांच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवून लाखो कार्यकर्ते गावागावात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ह्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आणि कष्टावर आज पक्ष दिमाखात उभा आहे असे सांगत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. आणि महाराष्ट्राच्या जनतेचं प्रेम सातत्यानं लाभलं असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष आहे. 2014 च्या निवडणुकीचा अपवाद वगळता जनतेनं मोठ्या विश्वासानं आघाडीच्या माध्यमातून राज्यात सत्तेत आणून जबाबदारी सांभाळण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल तमाम जनतेचे देखील त्यांनी आभार मानले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जनतेच्या प्रेमाच्या बळावर आपली जागा निर्माण केली. जात-पात, धर्म, पंथ, प्रांत यात कुठलाही भेदभाव न करता सर्व समाज घटकाला सोबत घेऊन पक्ष पुढे आपली वाटचाल करीत आहे. सर्व समाज घटकांना संधी उपलब्ध करून देत ही वाटचाल पुढे सुरूच राहणार आहे. हृदयात महाराष्ट्र आणि नजरेसमोर राष्ट्र अशा व्यापक विचाराच्या दृष्टिकोनातुन आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. 22 वर्षांत त्यांनी शेती, विज्ञान, उद्योग, शिक्षण, सहकार, समाजसेवा, राजकारण अशा अनेक क्षेत्रांत काम करणारे नेते-कार्यकर्ते निर्माण केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातल्या मातीशी आणि इथल्या माणसाशी नातं सांगणारा पक्ष आहे. 

राज्यातल्या जनतेशी नाळ जुळलेला पक्ष आहे. महाराष्ट्रासारखीच पक्षाची स्थापना सुद्धा संघर्षातुन झाली आणि संघर्ष करतच पक्ष मोठा झाला आहे. कोरोना संकट काळात बेड, औषधं, अन्नधान्य यांसारख्या अत्यावश्यक गरजा वेळोवेळी पुरवण्याचा प्रयत्न पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला. कोरोना असेपर्यंत आपल्याला असंच काम करत रहायचं आहे. थकून चालणार नाही. स्वतःची काळजी घेऊन कार्य अविरत सुरूच राहिलं पाहिजे, असं वर्धापन दिनानिमित्तानं त्यांनी आवाहन केले. 

पक्षानं आजपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना आरक्षण, वडिलोपार्जित संपत्तीत मुलींना वाटा, महिलांसाठी देशातलं पहिलं महिला धोरण आणि महाराष्ट्रातील फळबाग योजना असे अनेक निर्णय पक्षाच्या माध्यमातून राज्यात घेण्यात आले आहेत. साहेबांच्या दूरदृष्टीनं पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रगतीची वाटचाल अधिक गतिमान झाली आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. महाराष्ट्रासह देशाच्या नवनिर्माणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला वाटा उचलेल, यात कोणतीही शंका नाही. याच दृष्टिकोनातून पक्षाची पुढची वाटचाल राहील, याची खात्री आहे असा विश्वास त्यांनी शेवटी आपल्या भाषणात व्यक्त केला.