दौंड : दौंडचे आमदार अॅड. राहुल कुल यांच्या माध्यमातून मागील आठवडाभरात खालील आठ रुग्णांना सुमारे २१ लाख ५० हजारांची वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.
या मध्ये धर्मादाय रुग्णालय योजनेद्वारे देऊळगाव गाडा, (ता. दौंड) येथील सुखदेव दशरथ बारवकर यांची १ लाख रुपये खर्च असणारी मुतखड्याची शस्त्रक्रिया व उपचार पुण्यातील एका नामांकित रुग्णालयामध्ये पूर्णपणे मोफत करण्यात आले तर तेथीलच सौ. मंदा संपत बारवकर यांच्याही ५ लाख रुपये खर्च असलेली गुडघ्याची शस्त्रक्रिया व उपचार मुंबईतील एका नामांकित रुग्णालयामध्ये पूर्णपणे मोफत करण्यात आले आहे.
आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून अवघ्या आठ दिवसांत या मोफत शस्त्रक्रिया पार पडल्या असून त्यामध्ये पुढील शस्त्रक्रिया पडवी, माळवाडी (ता. दौंड) येथील रामचंद्र रघुनाथ लव्हे यांची सुमारे २ लाख ५० हजार रुपये, रांजणगाव सांडस, (ता. शिरूर) येथील विष्णू किसन नलगे यांची गुडघ्याची शस्त्रक्रिया ५ लाख रुपये, दामोदर आप्पा तांबे यांच्या गुडघ्याची सुमारे ५ लाख ५० हजार रुपयांची शस्त्रक्रिया तसेच सौ. बेबीताई महादेव पंडित केडगाव, (ता. दौंड) यांच्या वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून १ लाख रुपये निधी मिळवून देण्यात यश आले आहे.
तर राजेंद्र लक्ष्मण भोसले उरुळी कांचन, (ता. हवेली) यांच्या वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपये आणि मोहन आश्रित दळवी, खामगाव, (ता. दौंड) यांच्या वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून १ लाख रुपये अशी एका आठवड्यामध्ये एकूण २१ लाख ५० हजार रुपयांची शस्त्रक्रिया व उपचार आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून मोफत करण्यात यश आले आहे.