| सहकारनामा | – अब्बास शेख
दौंड : 2020 हे साल कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे घरातच गेले. मात्र जसे 2021 हे वर्ष सुरू झाले तशी लोकांच्या मनातील भीती कमी होऊ लागली, जणू काही 2021 हे साल कोरोनाचा कर्दनकाळ आहे हे समजून लोकांनी तोंडावरचे मास्क ही बाजूला सारले. आणि 2021 च्या सुरुवातीलाच अनेक धर्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे सर्रासपणे आयोजन केले जाऊ लागले. वर्षभर 2020 मध्ये रखडलेली अनेक कामे एकाचवेळी उरकण्याचा जणू चंगच लोकांनी बांधला आणि मग सुरू झाली हजारो लग्नकार्ये, धार्मिक कार्यक्रम… हे सर्व सुरू होते फेब्रुवारी महिन्यात आणि त्यानंतर मार्च महिना उजाडला तोपर्यंत जसाकाय कोरोना कायमचा हद्दपार झाला आहे हे समजून समजूतदार लोकांनीही सोशल डिस्टनसिंग पाळणे, मास्क घालणे, हे कोरोनाला अटकाव करणारे नियम देखील पाळायचे सोडून दिले होते.
हे सर्व होत असताना मात्र दबा धरून बसलेला कोरोना या संधीचा गैर फायदा घेऊन त्याने आपले हल्ले सुरू केले. आणि आता या एप्रिल महिन्यात कोरोना सर्वांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.
याला कारणीभूत आपणच असून गेल्या वर्षी कोरोना विषाणूला हरवण्यासाठी प्रत्येकाने संकल्प केला होता. यावर्षी मात्र जसा काय कोरोना हद्दपार झाला आहे असे समजून लोक बिनधास्तपणे वागू लागले आणि त्याचा फटका मग सर्वांनाच बसत चालला आहे. ज्यांना अजूनही कोरोनाची गंभीरता समजली नसेल त्यांनी आपल्या जवळच्या स्मशानभूमीला एकदा भेट द्यावी त्यामुळे तिथे एका पाठोपाठ एक जळणाऱ्या चिता पाहून तरी आपल्याला कोरोनाच्या भयावह परिस्थितीचा नक्कीच अंदाज येईल.