सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याकरीता जिल्हा निवडणूक आराखडा-2020 जाहीर, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांची माहिती



पुणे : सहकारनामा

राज्य शासनाच्यावतीने कोवीड -19 ही जागतिक महामारी घोषीत करण्यात आल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर 18 मार्च 2020 पासून राज्यातील सहकारी संस्थाच्या सुरु असणा-या निवडणुका आहेत त्या टप्प्यावर थांबविल्या होत्या. कोविडच्या पार्श्वभुमीवर थांबविण्यात आलेल्या आणि निवडणुकीस पात्र असणा-या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर थांबविण्यात आलेल्या होत्या त्या टप्प्यापासून पुढे सुरु करण्याबाबत शासनाने 2 फेब्रुवारी 2021 रोजी आदेश दिलेले आहेत. 

या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याकरिता प्राधिकरणाने पूर्वतयारी केलेली असून एकूण चार टप्प्यामध्ये या निवडणुका घेण्याकरीता जिल्हा निवडणूक आराखडा-2020 जिल्हानिहाय जाहीर करण्यात आल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. पाटील म्हणाले, प्राधीकरण गठीत झाल्यापासून 31 डिसेंबर 2020 अखेर अ, ब, क, ड या वर्गीकरणाच्या एकूण निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांची संख्या 44 हजार 613 इतकी आहे. टप्पा क्रमांक 1 मध्ये यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया सुरु झालेल्या परंतु कोविडमुळे प्रक्रिया थांबविण्यात आलेल्या 3 हजार 213 सहकारी संस्थाचा समावेश आहे. 

या टप्प्यातील निवडणुका 15 फेब्रुवारी 2021 पासून निवडणूक प्रकिया सुरु करुन सामान्यपणे विहीत मुदतीमध्ये पूर्ण करण्यात येणार आहेत. टप्पा क्रमांक 2 मध्ये 12 हजार 508 सहकारी संस्थाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. या टप्प्यातील निवडणुका 30 एप्रिल 2021 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. 

टप्पा क्रमांक 3 मध्ये एकूण 14 हजार 301 सहकारी संस्थाचा समावेश असून या टप्प्यातील निवडणुका 31 मे 2021 अखेर पूर्ण करण्यात येणार आहेत. टप्पा क्रमांक 4 मध्ये एप्रिल ते डिसेंबर 2020 अखेरच्या एकुण 14 हजार 591 सहकारी संस्थाच्या निवडणुका घेण्यात येणार असुन या टप्प्यातील निवडणुका 30 जून 2021 अखेर पूर्ण करण्यात येणार आहेत. टप्पा क्रमांक 2 ते 4 बाबत निवडणूकीस पात्र असणा-या सहकारी संस्थांच्या मतदारांची प्रारूप मतदारयादी तयार करण्याकरीता अर्हता दिनांक हा टप्पानिहाय प्राधीकरणाकडून स्वतंत्र आदेशाने जाहीर करण्यात येणार आहे.

जिल्हा निवडणूक आराखडा-2020 मधील नमूद निवडणूक पात्र सहकारी संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतरच सन 2021 च्या ई -1 प्रमाणे पात्र एकूण 19 हजार 716 सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत प्राधीकरण स्वतंत्र आदेश निर्गमित करणार आहे. निवडणुका या टप्पानिहाय विहीत कालमर्यादेमध्ये पूर्ण करण्याबाबत प्राधीकरणाकडून नियोजन व पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी म्हटले.