पिसाळलेला कुत्रा चावल्याने 20 नागरिक जखमी! म्हसोबा यात्रेतील घटनेने भाविकांमध्ये संताप

दौंड : राज्य राखीव पोलीस दल परिसरातील म्हसोबा यात्रेत पिसाळलेल्या कुत्र्याने जवळपास 20 च्या आसपास भाविकांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना घडली आहे. जखमींमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

या दुर्दैवी घटनेचा नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. शहरातील भटक्या व बेवारस कुत्र्यांचा दौंड नगरपालिकेने काहीतरी बंदोबस्त करावा अशी येथील अनेक पक्ष,संघटनांनी मागणी केली आहे. मात्र नगरपालिकेने हा विषय कधीच गांभीर्याने न घेतल्याने अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे.
या घटनेबाबत स्थानिकांनी दिलेली माहिती अशी की, दौंड- कुरकुंभ मार्गावरील राज्य राखीव पोलीस दल परिसरात म्हसोबा यात्रा होती.

या यात्रेला नेहमीच मोठी गर्दी असते. यात्रेदरम्यान या परिसरात एक पिसाळलेला कुत्रा गर्दीत घुसला व त्याने अचानक दिसेल त्याच्यावर हल्ला करीत जखमी केले. या पिसाळलेल्या कुत्र्याने जवळपास 15 ते 20 लोकांना चावा घेऊन जखमी केले, ज्यामध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. यात्रेमध्ये पिसाळलेला कुत्रा घुसल्याने मोठा गोंधळ उडाला. जखमींना उपचारासाठी येथील सरकारी दवाखान्यामध्ये नेण्यात आले परंतु नंतर त्यांना पुण्यातील सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आल्याची माहिती काहींनी दिली.

या आधीही शहरामध्ये पिसाळलेला कुत्रा चावल्याने एका अल्पवयीन मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नगरपालिकेने आता तरी येथील भटक्या व बेवारस कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशा मागणीने जोर धरला आहे.