काय सांगता.. चोरांना पाहून पोलिसांनी ठोकली धूम! 2 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, औंध येथील प्रकार



पुणे : सहकारनामा 

अनेक ठिकाणी चोरटे आले की नागरिक पोलीसांना फोन करतात आणि पोलीस आल्याची चाहूल लागली की चोरटे धूम ठोकतात… असा आजपर्यंतचा इतिहास आहे.

मात्र या इतिहासाला दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी हरताळ फासला असून चोरट्यांना पाहून या पोलीस कर्मचाऱ्यांनी धूम ठोकल्याने पोलीस प्रशासनाची पुरती नाचक्की झाली आहे. यामुळे या पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

हा सर्व प्रकार मंगळवारी समोर आला असून औंध येथील सोसायटीत हि घटना घडली आहे. या प्रकरणी उपायुक्त नम्रता पाटील यांनी पोलीस हवालदार प्रवीण गोरे आणि पोलीस नाईक अनिल अवघडे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार औंध येथील मधील एका सोसायटीत शस्त्रे घेऊन चोरटे शिरले होते ही माहिती चतुर्श्रुंगी पोलिसांना समजताच त्यांनी त्या भागात असणाऱ्या ड्युटीवर असणाऱ्या वरील दोन कर्मचाऱ्यांना सांगितले. हे दोघेजण तात्काळ तेथे पोहोचले मात्र चोरटे तेथून  बाहेर येत असल्याचे त्यांनी पाहताच पोलिसांनी त्यांनी अडविण्याऐवजी  त्यातील एका कर्मचाऱ्याने धूम ठोकली तर दुसरा कर्मचारी देखील त्यास पाहून पळून गेला मात्र  हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांची मोठी नाचक्की झाली.

मिळत असलेल्या माहितीनुसार यातील एका पोलीस कर्मचाऱ्याकडे रायफल असल्याचेही सांगितले जात आहे मात्र तरीही चोरट्यांना प्रतिकार न करता पोलीस पळून गेल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.