‛केडगाव’मध्ये सशस्त्र दरोडा! महिलांच्या अंगावरील 2 तोळे सोने आणि 52 हजार रुपये चोरले



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील केडगावमध्ये चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकून महिलांच्या अंगावरील 2 तोळे सोने आणि तिजोरीतील 52 हजार रुपयांची रक्कम घेऊन गेल्याची घटना घडली आहे.

याबाबत रायबा पोपटराव पवार (वय 68, रा.केडगाव स्टे.थोरात हॉस्पिटलजवळ, ता.दौंड जि.पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत यवत पोलीस आणि फिर्यादी रायबा पवार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 22 जानेवारी 2021 रोजी मध्य रात्री 2:30 च्या सुमारास फिर्यादी रायबा पवार यांना किचनमध्ये कसला तरी आवाज होत असल्याचे जानवले त्यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींना आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला व स्वतः तेथे जाण्याचा प्रयत्न केला असता  चोरट्यांनी त्यांचा दरवाजा बाहेरून बेडशीटच्या साहाय्याने बांधल्याने दरवाजा हा थोडाफार उघडत होता त्यामूळे त्यांना दुसऱ्या खोलीत जाणे अशक्य होते. 

यावेळी या चोरट्यांनी महिलांच्या जवळ जाऊन त्यांच्या अंगावरील दागिने शस्त्राचा धाक दाखवून ओरबाडून घेतले. तर इतर  चोरट्यांनी कपाटातील 52 हजार रुपायांची रक्कम चोरून धूम ठोकली. फिर्यादी रायबा पवार यांनी सांगितल्यानुसार साधारण सहा ते सात चोरटे घरात घुसले होते तसेच त्यांच्या हातामध्ये धारदार शस्त्रे दिसत होती. घरातील दरवाजे मजबूत असतानाही चोरट्यांनी कशाच्या तरी साहाय्याने हे दरवाजे तोडून आतमध्ये प्रवेश केला होता. चोरट्यांच्या हातामध्ये शस्त्रे होती त्यामुळे आम्ही त्यांना प्रतिकार करू शकलो नाही. चोरटे गेल्यानंतर पवार यांनी आरडा ओरडा करून परिसरातील नागरिकांना जागे केले मात्र तोपर्यंत या चोरट्यांनी पोबारा केला होता.

काही दिवसांपूर्वीच सशस्त्र चोरट्यांनी केडगाव स्टेशन येथील दत्तापार्कमध्येही शस्त्रे घेऊन फ्लॅट फोडण्याचे प्रयत्न केले होते. ती घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती.

घटनेची माहिती मिळताच यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पवार यांच्या घरी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. अधिक तपास यवत पोलीस करत आहेत.